मनपाच्या सहकार्याने बेवारस श्वानांच्या अन्नाचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:35 PM2020-05-05T23:35:11+5:302020-05-05T23:40:04+5:30

लॉकडाऊनमुळे गरीब, बेघर, गरजू, कामगार या सर्वांचेच हाल होत आहेत. या सर्वांची काळजी घेत मनपाने बेघर निवारा केंद्रामध्ये अशा व्यक्तींची व्यवस्था केली. मात्र जे आपली व्यथा मांडू शकत नाही व सांगूही शकत नाही अशा बेवारस श्वानांसाठीही मनपाने पुढाकार घेतला आहे.

With the help of the corporation, the problem of food for stray dogs was solved | मनपाच्या सहकार्याने बेवारस श्वानांच्या अन्नाचा प्रश्न सुटला

मनपाच्या सहकार्याने बेवारस श्वानांच्या अन्नाचा प्रश्न सुटला

Next
ठळक मुद्देसेवाभावी लोकांचे सहकार्य : दररोज हजारो पोळ्यांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे गरीब, बेघर, गरजू, कामगार या सर्वांचेच हाल होत आहेत. या सर्वांची काळजी घेत मनपाने बेघर निवारा केंद्रामध्ये अशा व्यक्तींची व्यवस्था केली. मात्र जे आपली व्यथा मांडू शकत नाही व सांगूही शकत नाही अशा बेवारस श्वानांसाठीही मनपाने पुढाकार घेतला आहे. कार्याला शहरातील अनेक सेवाभावी संस्था व नागरिकांनीही हातभार लावला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे दररोज शहरातील हजारो बेवारस श्वानांच्या अन्नाचा प्रश्न सुटला आहे.
शहरातील बेवारस श्वानांचे जीवन हॉटेलमधून, घराघरातून मिळणाऱ्या अन्नावर अवलंबून आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांचीही मोठी वाताहत होत असल्याची बाब लक्षात घेता मनपाद्वारे या प्राण्यांच्या अन्नासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात मनपाची टीम शहरातील विविध भागातील श्वानांना अन्न पुरविण्याच्या कार्यात सहकार्य करीत आहे. या कार्यासाठी शहरातील पशुप्रेमी तसेच सेवाभावी संस्था व नागरिक पुढे आले आहेत.

या सेवा कार्यासाठी मनपाने दोन वाहने तसेच काही कर्मचारीही दिले आहेत. शहरातील विविध भागात बेवारस श्वानांचा शोध घेउन त्यांना ताजे अन्न पुरविण्याचे कार्य अविरत सुरू आहे. यासाठी पाचपावली येथील गुरुनानक गुरुद्वारामधून जसमीतसिंग भाटिया आणि कर्नलजीतसिंग यांच्याकडून पोळ्या तयार करून मिळतात. सुधा अग्रवाल यांच्याकडून या कार्यासाठी २ हजार किलो गव्हाचे पीठ तर किरीट जोशी यांच्याकडून दररोज १०० किलो गव्­हाचे पीठ दिले जाते.
घाटे रेस्टॉरंटचे मालक विनोद घाटे हे दररोज एक हजार पोळ्या आणि २५ लिटर दूध देत आहेत. करिष्मा गलानी यांचे या कार्यामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्यामार्फत विविध ठिकाणी मोकाट प्राण्यांना अन्न पोहोचविण्याचे कार्य होत आहे. हिंगणा मार्ग, अंबाझरी आणि हिलटॉप परिसरात अंजली वैद्य, छत्रपती चौक ते विमानतळ परिसर आणि नरेंद्रनगर परिसरात रिना त्यागी आणि अर्पणा मोडक, हजारीपहाड, दाभा, फुटाळा, अमरावती मार्ग परिसरात स्मिता मीरे, म्हाळगी नगर, मानेवाडा, बेसा, हुडकेश्वर परिसरात स्वप्नील बोधाने, नंदनवन, वाठोडा, मोठा ताजबाग, के.डी.के. कॉलेज परिसरामध्ये निकिता बोबडे, मानकापूर ते कोराडी मंदिर परिसरामध्ये आशिष कोहळे, जरीपटका, सदर, पागलखाना, गिट्टीखदान परिसरात चार्ल्स लिओनॉर्ड, गोळीबार चौक, सतरंजीपुरा, शांतिनगर या परिसरामध्ये राम नंदनवार, गणेशपेठ नूतन रेवतकर, झिंगाबाई टाकळी, गोधनीमध्ये सौंदर्या रामटेके, गोपालनगर, प्रतापनगर परिसरात जया वानखेडे, मेडिकल चौक परिसरामध्ये एकांश ढोबळे असे अनेक सेवाभाजी नागरिक स्वत: अन्न तयार करून आपापल्या परिसरात प्राण्यांना देत आहेत. मनपाद्वारे अशा ९० सेवाभावी लोकांना मनपा प्रशासनाकडून परवानगी पास उपलब्ध करून देण्यात आला आहे.

चहाटपरी चालविणाऱ्या महिलेकडून २० किलो पीठाच्या पोळ्या
काटोल रोड परिसरात राहणाऱ्या गीता देवत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चहा टपरी चालवितात. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय बंद आहे. तरीही त्या दररोज निस्वार्थपणे बेवारस प्राण्यांना २० किलो पीठाच्या पोळ्या देण्याचे कार्य करीत आहे. या कार्यासाठी सुरुवातीला पोलिसांकडून अडविण्यात आले. मात्र त्यांचे कार्य पाहता पोलीस कर्मचारी आशिष दुबे हे त्यांना साथ देत आहेत.

Web Title: With the help of the corporation, the problem of food for stray dogs was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.