नागपूर : चित्रपट अभिनेत्री करिष्मा कपूरविरोधातील एका दिवाणी दाव्याच्या प्रकरणाची सुनावणी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. एल. दीक्षित यांच्या न्यायालयात १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्रकरण असे की, निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने २५ जानेवारी २०१३ रोजी उमरेड मार्गावरील निर्मलनगरीत करिष्मा कपूर ऊर्फ लोलो हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निर्मल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी या कार्यक्रमासाठी करिष्माला अग्रीम रक्कमही अदा केली होती. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी कोणतीही पूर्वसूचना न देता ती कार्यक्रमाला अनुपस्थित राहिली. त्यामुळे आयोजकाचे मोठे नुकसान झाले. २ एप्रिल २०१३ रोजी निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने प्रमोद मानमोडे यांनी अॅड. श्रद्धानंद भुतडा यांच्यामार्फत करिष्मा कपूर, मॅट्रिक्स इंडिया एन्टरटेन्मेंट, इशिता ठक्कर, युवराज एन्टरटेन्मेंट मुंबई आणि सिद्धार्थ तिवारीविरुद्ध ३५ लाखांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारा दिवाणी दावा दाखल केला होता. १८ रोजी या प्रकरणी सुनावणी होऊन प्रारंभी प्रमोद मानमोडे आणि नंतर अभिनेत्री करिष्माचे बयाण होणार आहे. करिष्मा ही आपल्या वकिलाच्या मार्फतही न्यायालयात आपले लिखित बयाण सादर करू शकते. (प्रतिनिधी)
करिष्मा कपूरप्रकरणी १८ रोजी सुनावणी
By admin | Updated: February 11, 2016 03:25 IST