आरोग्य सेवा अधिक सक्षम करणार : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:37 AM2020-03-19T00:37:58+5:302020-03-19T00:39:16+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधिक बळकट व सक्षम करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Healthcare will enable more: Anil Deshmukh | आरोग्य सेवा अधिक सक्षम करणार : अनिल देशमुख

आरोग्य सेवा अधिक सक्षम करणार : अनिल देशमुख

Next
ठळक मुद्देसामूहिक संसर्ग टाळण्यासाठी विशेष पथक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार सातत्याने वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना परिणामकारक राबवतानाच यापुढे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधिक बळकट व सक्षम करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात कोरोना उपचारासंदर्भात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
कोरोनाचा सामूहिक संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व प्रभावी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधेत वाढ करावी यासाठी व्हेंंटिलेटरसह आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येतील. व्हेंटिलेटर खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

इतर जिल्ह्यातून मनुष्यबळ मागवा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन कक्ष अधिक सुसज्ज करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ इतर जिल्ह्यातूनही मागविण्यात यावे. अतितात्काळ असणाऱ्या आरोग्य सेवा वगळता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाला प्राधान्य द्या. ट्रामा सेंटरसाठी असलेले २० व्हेंटिलेटर तात्काळ सुरू करून त्याचा वापर प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावा. हायरिस्क असलेले कोरोना संशयित रुग्ण तसेच ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले डायबिटीज व इतर आजार असलेल्या संशयित नागरिकांना प्राधान्याने उपचार करावेत, असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

शासकीय कार्यालयात सॅनिटायझरचा वापर करा
जिल्हा परिषदेसह इतर कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सॅनिटायझर अथवा साबणाने हात स्वच्छ केल्यानंतरच प्रवेश देण्यात यावा. कुठेही अस्वच्छ वातावरण राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश यावेळी गृहमंत्र्यांनी दिले.

मेडिकलमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्यास प्राधान्य
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही तपासणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्याला प्राधान्य असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या तपासणी किट, सेफ्टी किट, ट्रिपल एअर मास्क आदी उपलब्ध असून, विभागातील सर्व जिल्ह्यांना आवश्यकतेनुसार पुरविण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिली.

Web Title: Healthcare will enable more: Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.