नागपूर : सीताबर्डी बाजारात सर्वत्र पसलेले हॉकर्स, टाऊन व्हेंडिंग कमिटी स्थापनेत होत असलेला विलंब आणि हॉकर्स झोन घोषित करण्यातील उदासीनता या मुद्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला फटकारले.
यासंदर्भात सीताबर्डीतील दुकानदारांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. हॉकर्ससोबत वाद झाल्यामुळे दुकानदारांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. त्यावरून एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यावर दुकानदारांचा आक्षेप आहे. दरम्यान, मनपाने टाऊन व्हेंडिंग कमिटी स्थापनेवर उत्तर सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागितला. त्यामुळे न्यायालयाने मनपाला फटकारले. ते या महत्त्वाच्या प्रकरणात उदासीनता दाखवीत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात हॉकर्स झोन तयार करणे आवश्यक आहे. मनपा या आदेशाचे तातडीने पालन करेल अशी अपेक्षा न्यायालयाने गेल्या तारखेला व्यक्त केली होती. परंतु, मनपाद्वारे हे प्रकरण अंत्यंत संथ गतीने हाताळण्यात येत असल्याचा आणि पोलीस हॉकर्सना नियंत्रित करण्याऐवजी दुकानदारांवर कारवाई करीत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.