माजी नगरसेवकांची मेहनत जाईल पाण्यात; नवीन मतदारांना संधी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 12:27 PM2022-05-12T12:27:12+5:302022-05-12T12:30:31+5:30

निवडणूक आयोग १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

Hard work of former corporators in water; No chance for new voters! | माजी नगरसेवकांची मेहनत जाईल पाण्यात; नवीन मतदारांना संधी नाही!

माजी नगरसेवकांची मेहनत जाईल पाण्यात; नवीन मतदारांना संधी नाही!

Next
ठळक मुद्देजानेवारी २०२२ मधील मतदार यादी मनपा निवडणुकीत गृहीत धरणार

गणेश हूड

नागपूर : महापालिकेची निवडणूक लवकरच होणार असून जानेवारी २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील मतदारांनाच मतदान करता येईल. त्यानंतर मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना मतदान करता येणार नाही. यामुळे माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी मेहनत करून केलेली मतदार नोंदणी वाया जाणार आहे.

महापालिकांच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून तयार करण्यात येणारी मतदार यादी वापरण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोग १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी पुरवणी मतदार यादी तयार करण्यात येते. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दहा दिवस अगोदर अर्ज करणाऱ्या मतदारांचा समावेश पुरवणी मतदार यादीमध्ये होत असतो. महापालिका निवडणुकांसाठी पुरवणी मतदार यादी तयार करण्यात येत नाही. त्यामुळे जानेवारीनंतर मतदार यादीत नाव नोंदविणाऱ्यांना मतदान करता येणार नाही. असे निवडणूक आयोगाचे संकेत असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

मतदार यादीत सप्टेंबरनंतर येणार नावे

महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन माजी नगरसेवक व इच्छुकांनी आपापल्या प्रभागांमध्ये मतदार नोंदणीसाठी मोहीम घेऊन मतदारांचे ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज भरून घेतले आहेत. हक्काचे मतदार मिळण्यासाठी केलेले हे प्रयत्न वाया जाणार आहेत. संबंधित मतदारांची नावे सप्टेंबर नंतर प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत. मात्र, महापालिका निवडणुका या त्यापूर्वीच होण्याची शक्यता असल्याने संबंधित मतदार महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार

दक्षिण-पश्चिम नागपूर -३७४४८९

दक्षिण नागपूर -३७७६६९

पूर्व नागपूर -३७४८७५

मध्य नागपूर -३१६८३९

पश्चिम नागपूर -३५८००२

उत्तर नागपूर -३९५३७०

एकूण -२१९७२४४

Web Title: Hard work of former corporators in water; No chance for new voters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.