नागपूर : रेल्वेगाड्यात पैशासाठी भिकारी प्रवाशांना वेठीस धरतात. अशा २६८ भिकाऱ्यांविरुद्ध सुरक्षा दलाने १ एप्रिल २०१४ ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान कारवाई करून २ लाख ३ हजार ६०० रुपये वसूल केले. तर याच कालावधीत ४५० तृतीयपंथींना ४ लाख ५५ हजार १०० रुपये दंड आकारल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने उघड केली आहे. दीनदयालनगरातील पडोळे ले-आऊटमधील आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात रेल्वे प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नानंतर ही माहिती उघड झाली आहे. रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडुन परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु हा परवाना न घेता असंख्य अनधिकृत व्हेंडर रेल्वेत खाद्यपदार्थांची विक्री करतात. अवैध व्हेंडरची संख्या दिवसेंदिवस रेल्वेगाड्यात वाढत आहे. अशा ४ हजार ४३३ अवैध व्हेंडरला पकडून आरपीएफने रेल्वे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ५ कोटी २३ लाख ४ हजार २६१ रुपये दंड आकारला आहे. रेल्वेस्थानकावर पार्किंगसाठी जागा ठरवून दिलेली आहे. परंतु तरीसुद्धा असंख्य वाहनचालक मनाला वाटेल तेथे आपले वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. रेल्वे सुरक्षा दलाने वरील कालावधीत अशा १ हजार ७ बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. रेल्वे न्यायालयाने त्यांना २ लाख ४६ हजार ५० रुपये दंड आकारला. रेल्वेत तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचे रॅकेट सक्रिय आहे. रेल्वे सुरक्षा दलाने अशा ३५ दलालांवर कारवाई करून त्यांना न्यायालयासमोर हजर केल्याचेही अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात उघड केले आहे. (प्रतिनिधी)
भिकारी, तृतीयपंथींनी भरला ६.५८ लाखाचा दंड
By admin | Updated: June 7, 2015 02:50 IST