लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून 'लव्ह जिहाद'ची वास्तविकता दिसून आली आहे. महाराष्ट्रात अशा स्वरूपाचे प्रकरण वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार बळजबरीने लव्ह जिहाद विरोधी कायदा केला जाणार आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एका धर्माचा व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे यात गैर काही नाही. मात्र, खोटे बोलून, स्वतःची ओळख लपवून आंतरधर्मीय लग्न करणे आणि मूल जन्माला घालून लग्न केलेल्या तरुणीला सोडून देण्याची प्रवृत्ती सुरू आहे, ते योग्य नाही, यावर कारवाई करावी लागेल. त्यासाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा केला जाणार आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या भाजपशासित राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधात कायदा आहे, तर राजस्थानमध्ये या कायद्याशी संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.