हायकोर्ट : भंडारा जिल्ह्यातील हत्याप्रकरणानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात राज्य शासनाचे अपील खारीज केले आहे.३० आॅक्टोबर २००३ रोजी भंडारा सत्र न्यायालयाने प्रकरणातील चारही आरोपींना निर्दोष सोडले होते. या निर्णयाविरुद्ध शासनाने अपील केले होते. अमृत नारायण भोयर, प्रभू देवराव भोयर, अनिल देवराव भोयर व भय्या पंढरी मुनकर अशी आरोपींची नावे असून ते सोनेगाव, ता. साकोली येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव झिंगर नाथू खोये होते. ४ एप्रिल १९९८ रोजी झिंगर रात्रीचे भोजन करून अंगणात बसला होता. आरोपी त्याच्या घराजवळ रहात होते. झिंगरची देवराव भोयरकडे उधारी होती. तो पत्नीला जोराने ओरडून उधारी का मागितली नाही असे विचारत होता. दरम्यान, आरोपींनी तेथे येऊन झिंगरवर हल्ला केला. अनिल भोयरने कट्यारने वार केले तर, अन्य आरोपींनी काठ्यांनी मारले. जखमी झिंगरचा दुसऱ्या दिवशी रुग्णालयात मृत्यू झाला, असे पालांदूर पोलिसांचे म्हणणे होते. झिंगरची पत्नी लक्ष्मीबाईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. आरोपींना अटक केली. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने १२ साक्षीदार तपासले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.(प्रतिनिधी)
शासनाचे फौजदारी अपील खारीज
By admin | Updated: July 8, 2015 03:02 IST