नागपूर : सीताबर्डी ते मिहान आणि सीताबर्डी ते लोकमान्यनगर या मार्गावर मेट्रो पूर्वीच धावत असून आता पुन्हा मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. शुक्रवारी मेट्रो सीताबर्डी-झिरो माईल फ्रीडम पार्क-कस्तूरचंद पार्क मार्गावर धावू लागली आहे. महामेट्रोच्या १.६ किमी लांबीच्या सीताबर्डी-झिरो माईल फ्रीडम पार्क-कस्तूरचंद पार्क सेक्शन आणि फ्रीडम पार्कचे उद्घाटन शुक्रवारी व्हिडिओ लिंकद्वारे ई-फ्लॅगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी (व्हिडिओ लिंक), पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर दयाशंकर तिवारी, खा. कृपाल तुमाने, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ. अभिजित वंजारी, आ. गिरीश व्यास, आ. नागो गणार, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, आ. समीर मेघे, आ. आशिष जयस्वाल, आ. राजू पारवे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व अनिस अहमद, रमेश बंग, मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिवसेना नेते गिरीश पांडव, शहरी विकास मंत्रालयाचे सचिव व महामेट्रोचे अध्यक्ष दुर्गा प्रसाद मिश्रा, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित, कार्यकारी संचालक अनिल कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते.
विकास कार्य व जनतेच्या हितासाठी कार्यरत : उद्धव ठाकरे
विकास कार्यासाठी राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारला सर्वोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात एकत्रित राहून राज्याचा विकास व जनतेच्या हितासाठी कार्यरत राहणार आहे. प्रगती व विकासासाठी राज्यात मेट्रो आणि महामार्गाचे जाळे विणण्यात येत आहे. एलिव्हेटेड मेट्रोच्या खालील भागसुद्धा प्रकल्पाचा भाग समजून विकसित करावा.
नगरोत्थान योजनेला मुख्यमंत्र्यांनी निधी द्यावा : नितीन गडकरी
नितीन गडकरी यांनी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन देशातील पहिले २० मजली स्टेशन असल्याचे सांगून सुलभ वाहतुकीसाठी कॉटन मार्केट ते सायन्स कॉलेजपर्यंत सीआरएस फंडातून भूमिगत मार्ग बनविण्याची घोषणा केली. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य सरकारच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारनेसुद्धा बजेटमध्ये मंजुरी दिली आहे. दुसऱ्या टप्प्याची नोट कॅबिनेटमध्ये आली आहे. लवकरच मंजुरी मिळेल. जुन्या नागपूरच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसाठी बंद केलेला निधी मुख्यमंत्र्यांनी द्यावा. त्यामुळे या योजनेला मूर्त स्वरुप येईल.