नागपूर : तीन वर्षीय बाळाच्या आईने समाजासमाेर अवयवदानाचा आदर्श निर्माण केला. या संवेदनशील मातेने यकृत (लिव्हर) दान करून आपल्या ६१ वर्षीय सासऱ्याला नवीन जीवन दिले. एका मातेचे हे दातृत्व सासऱ्याच्या नवजीवनाचे द्याेतक ठरले आणि अवयवदानाबाबत फारशी जागृती नसलेल्या समाजासमाेर एक प्रेरणा.
पूजा काटाेले असे या सुनेचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी पूजा यांचे चुलत सासरे दीपक काटाेले यांची प्रकृती बिघडली. त्यांना यकृताचा आजार झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केले. यकृत म्हणजे शरीराचे जीवनरक्षकच हाेय. डाॅक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लान्ट करावे लागेल, हाच एकमेव पर्याय सांगितला. विशेष म्हणजे वैद्यकीय समस्येमुळे त्यांच्या मुलाला यकृत दान करणे अवघड हाेते. त्यामुळे आयुष्याची दाेरी तुटेल काय, अशी भीती हाेती. आता यकृत देण्यास काेण पुढे येणार हा सर्वांसमाेर प्रश्न हाेता. अशावेळी दीपक यांचा पुतण्या तुषारची पत्नी पूजा यकृत देण्यासाठी पुढे आली. यकृतदान केल्याने शरीरावर काही विपरीत परिणाम हाेतील, याचा विचारही तिने केला नाही. उल्लेखनीय म्हणजे ती तीन वर्षाच्या बाळाची आई आहे. मात्र अवयवदानाचे महत्त्व चांगले ठाऊक असल्याने सासऱ्याचा जीव वाचविण्यासाठी यापेक्षा श्रेष्ठ पर्याय नाही, असा विचार करून तिने निर्णय घेतला. गेल्या जानेवारीत गुडगाव येथील एका खासगी रुग्णालयात यकृत प्रत्याराेपणाची प्रक्रिया पार पडली. सात दिवसानंतर सून आणि सासऱ्यालाही सुटी झाली असून त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. पूजा आता सामान्यपणे तिचे नियमित कार्य करीत आहे.
नागपुरात अवयवदानाच्या जागृतीसाठी कार्य करणारे माेहन फाऊंडेशनचे डाॅ. रवी वानखेडे यांनी पूजाच्या दातृत्वाचे काैतुक केले आहे. समाजामध्ये अवयवदानाविषयी बरेच गैरसमज आहेत व ते दूर करण्याची गरज आहे. त्यांनी काही गाेष्टी यावेळी स्पष्ट केल्या. यकृतदान करताना पूर्ण यकृत काढावे लागत नाही तर यकृताचा काही भाग काढला जाताे व काही दिवसांनी ताे पूर्ववत हाेताे. यकृत दात्याला सहा-सात दिवसात रुग्णालयातून सुटी हाेते व दाेन-तीन आठवड्यात टाके काढले जातात. सहा ते आठ आठवड्यात त्यांचे यकृत पूर्ववत येते. त्यामुळे अवयवदानासाठी अधिकाधिक लाेकांनी पुढे यावे, असे आवाहन डाॅ. वानखेडे यांनी केले.