लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : ग्रामीण भागात गुरे व बकऱ्या चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पाेलीस मात्र इतर घटनांच्या तुलनेत या चाेरीच्या घटनांचा फारसा गांभीर्याने तपास करीत नाही. नांदागाेमुख (ता. सावनेर) शिवारातून मंगळवारी (दि. १६) दुपारी सात बकऱ्या चाेरट्याने चाेरून नेल्या. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपासकार्य सुरू केले. मात्र, मालकाने त्याच्या मित्रांना साेबत घेऊन त्या बकऱ्यांचा शाेध सुरू केला. शेवटी त्याला त्या बकऱ्या पिपळा (नारायणवार), ता. साैंसर, जिल्हा छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथून ताब्यात घेत परत आणल्या. दुसरीकडे, चाेरट्यांचा शाेध सुरू असल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
शेषराव व्यंकटराव घाेडमारे, रा. नांदागाेमुख, ता. सावनेर यांनी त्यांच्या नऊ बकऱ्या मंगळवारी सकाळी नांदागाेमुख शिवारातील धनंजय घाेडमारे यांच्या शेतात बांधून ठेवल्या आणि घरी परत आले. सायंकाळी यातील सात बकऱ्या चाेरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. त्यांनी लगेच इतरांकडे चाैकशी करीत त्या बकऱ्यांचा स्वत: शाेध सुरू केला.
दरम्यान, मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांना खुर्सापार (ता. सावनेर) शिवारातील एका छाेट्या मालवाहू वाहनात बकऱ्यांचे केस आढळून आले. त्यांनी ते वाहन केळवद पाेलीस ठाण्यात आणले. शिवाय, पिपळा (नारायणवार) येथे जाऊन शाेधकार्य सुरू केले. तिथे नंदू लाड याच्या घरी त्यांना त्यांची एक बकरी दिसली. अन्य पाच बकऱ्या पिपळा (नारायणवार) येथील पंकज डाेईफाेडे याला २३ हजार रुपयांमध्ये विकल्याची माहिती नंदूने शेषराव यांना दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सातही बकऱ्या पिपळा (नारायणवार) येथून ताब्यात घेत त्या मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास नांदागाेमुख येथे परत आणल्या.
...
पाेलीस निश्चिंत
चाेरून नेलेल्या बकऱ्यांची एकूण किंमत ५५ हजार रुपये असल्याची माहिती शेषराव घाेडमारे यांनी दिली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. शेषराव यांनी स्वत: बकऱ्यांचा शाेध घेतल्याने केळवद पाेलीस मात्र निश्चिंत झाले आहेत. नागरिकांनी बकऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे एमएच-४०/एआर-५५०३ क्रमांकाचे वाहन पाेलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणातील संशयितांचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली.