- आचार्यश्री गुप्तिनंदी गुरुदेव यांचे विचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्व शांती अमृत वर्धमानोत्सव अंतगृत श्री धर्मराजश्री तपोभूमी दिगंबर जैन ट्रस्ट व धर्मतीर्थ विकास समितीच्यावतीने ऑनलाईन सोहळा साजरा केला जात आहे. यात आचार्यश्री गुप्तिनंदी गुरुदेव यांनी मार्गदर्शन केले. निसर्गाचे शोषण करू नका, प्राकृतिक जीवन जगा. विश्वशांती अणुबॉम्बने मिळणार नाही तर अणुव्रतांतून मिळणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींतील बदल जीवनाला सुंदर बनवतो. कोरोना नियमांचे पालन करा, आजार असेल तर लपवू नका, तपासणी अवश्य करा. यमदुतापेक्षा मोठा वैद्यराज आहे. सत्य-अहिंसेचे पालन करा, कर्तव्याचे प्रामाणिपणे निर्वहन करा. भावनिक हिंसेपासून परावृत्त व्हा आणि आत्मविश्वास वाढवा, असे गुरुदेव यावेळी म्हणाले.
यावेळी आज्ञासागर मुनिराज यांनी भक्ती हाच मुक्तीचा मार्ग असल्याचे सांगितले. भगवान महावीर यांनी कोणत्याही व्यक्तिविशेष, जातीला विशेष स्थान दिले नाही. सर्व प्राणिमात्रांसाठी दयेचा भाव जागविला. महावीरांना ओळखणारे व महावीर बनणारे खूप कमी आहेत. भगवान महावीर यांनी जीवमात्रांच्या कल्याणासाठी उपदेश केला. महावीर म्हणतात, मंदिर निर्माण, जीर्णोद्धार, पूजापाठ, आहार दान, सेवा, जीवदया हे सारेच धर्म आहेत. धर्म वेगळा नाही. कर्म, आपत्तीपासून मुक्त होण्याचा सार धर्म आहे. अपरिग्रहाचा स्वीकार करून संतोषमय जीवन जगता येते, असे मुनिराज म्हणाले. धर्मसभेचे संचालन गणिनी आर्यिका आस्थाश्री माता यांनी केले.
..................