The girl's brutal murdered, the accused friend arrested | तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी मित्रास अटक

तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी मित्रास अटक

ठळक मुद्देनागपूर-पांढुर्णा महामार्गावरील सावळी (मोहतकर) येथील घटनामृत तरुणी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायची

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर/नांदागोमुख ): केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-पांढुर्णा (मध्य प्रदेश) महामार्गावरील सावळी (मोहतकर) शिवारात असलेल्या नालीच्या काठी शनिवारी (दि. १३) सकाळी तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तिचा डोक्यावर दगड व शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ती ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायची, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यात तिच्या मित्राला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
खुशी जगजित परिहार (२०) रा. हिंगणा असे मृत तरुणीचे तर अशरफ अफसर  शेख (२८) रा. गिट्टीखदान, नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जगजित हे तिचे सावत्र वडील होत. तिला ‘मॉडेलिंग’ची आवड होती. ती आईवडिलांपासून वेगळी राहायची. तिने त्यांच्यासोबत संपर्कही तोडला होता. ती राय इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युलियर कॉलेजची विद्यार्थिनी होती. मध्यंतरी ती अशरफच्या संपर्कात आली. दोघेही गिट्टीखदान, नागपूर येथे पाच महिन्यांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे. अशरफ त्याच्या आईवडिलांपासून वेगळा राहात असला तरी तो त्यांच्या संपर्कात होता. शिवाय, ती नेहमीच मित्रांसोबत ‘पब’मध्ये जायची.
अशरफ कोणताही कामधंदा करीत नसून, तो वडिलांच्या पैशावर स्वत:च्या व तिच्या संपूर्ण गरजा पूर्ण करायचा. तिचे दुसऱ्यासोबत ‘अफेयर’ असल्याचा त्याला खात्रीलायक संशय होता. तो लक्ष ठेऊन असल्याचे तिच्या ध्यानात आल्याने त्यांच्यात महिनाभरापासून भांडणे सुरू झाली होती. त्यातच तिचा शनिवारी सकाळी सावळी (मोहतकर) शिवारात मृतदेह आढळून आला. तिला केस पकडून किमान १५ फुटांपर्यंत नेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तिचा एक बूट पायात होता तर दुसरा एक फूट उंचावर पडला होता. या मार्गावर रक्ताचे नमुने आणि तिचे केस तसेच घटनास्थळी एक फूट लांब वेणी आढळून आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी केळवद पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
गुन्ह्याची कबुली
स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अशरफला शनिवारी सायंकाळी गिट्टीखदान (नागपूर) परिसरातून ताब्यात घेतले. त्याने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली देताच रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. त्याने तिला रात्री दारू पाजली आणि फिरायला जाण्याच्या निमित्ताने शहराबाहेर कारने घेऊन गेला. मध्यरात्रीच्या सुमारास तिला सावळी (मोहतकर) शिवारात नेले आणि तिथे तिचा खून करून मृतदेह फेकून दिला. त्यानंतर अशरफ नागपूरला त्याच कारने परत आला. त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली कार (एमएच-०२/एएम-४७६४ होंडा एसीई), शस्त्र व इतर बाबी जप्त करण्यासाठी तसेच यात त्याच्यासोबत सहआरोपी आहे काय, ते पडताळून बघण्यासाठी पोलीस रविवारी (दि. १४) त्याला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडीची न्यायालयाला मागणी करणार आहे.

Web Title: The girl's brutal murdered, the accused friend arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.