नागपुरात अंत्यसंस्कारासाठी घाट पडताहेत अपुरे ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:45 PM2020-09-13T12:45:41+5:302020-09-13T12:46:14+5:30

कोरोनाने निधन झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने शहरातील घाटांवर एकाच जागी तीन अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची स्थिती आहे. शहरातील घाट अपुरे पडत असल्याने अंत्यसंस्कारासाठी तिष्ठत उभे रहावे लागत आहे.

Ghats are insufficient for cremation in Nagpur. | नागपुरात अंत्यसंस्कारासाठी घाट पडताहेत अपुरे ..

नागपुरात अंत्यसंस्कारासाठी घाट पडताहेत अपुरे ..

googlenewsNext
ठळक मुद्देएकेका दहनस्थळी एकाचवेळी तीन अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाने निधन झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने शहरातील घाटांवर एकाच जागी तीन अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची स्थिती आहे. शहरातील घाट अपुरे पडत असल्याने अंत्यसंस्कारासाठी तिष्ठत उभे रहावे लागत आहे.

नागपूर शहरात असलेल्या पाच-सहा मुख्य मोक्षघाटांवर कोरोनाने मृत्यू पावलेल्या देहांचे दहन करण्यात येते. अलीकडे या संख्येत दररोज वाढ होत असल्याने हे घाट अपुरे पडत आहे. शहरातील घाटांची स्थिती सध्या पुढील प्रमाणे आहे..

सहकारनगर घाट
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या सहकारनगर घाटावर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यासाठी ४ ओटे आहेत. ऑगस्ट महिन्यात या घाटावर ७० मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. ४ सप्टेंबरपासून घाटावर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून येथे ५ च्या सरासरीने मृतदेह येत आहेत. पण ११ सप्टेंबरला येथे ९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार ओटे असताना ९ अंत्यसंस्कार करावे लागले. एका एका ओट्यावर ३ अंत्यसंस्कार येथे झाले. येथे गॅस दहनवाहिनीचे काम सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापासून मृतदेहांची संख्या घाटांवर वाढली आहे.

अंबाझरी घाट
धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या अंबाझरी घाटावर दक्षिण-पश्चिम नागपूर, पश्चिम नागपुरातील वस्त्यांमधून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. या घाटावर ११ ओटे आहेत. गॅस दहनवाहिनीसुद्धा आहे. येथे एरव्ही ६ ते ७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार व्हायचे. पण ऑगस्ट महिन्यापासून घाटावर अडीचशेच्या वर अंत्यसंस्कार झाले. सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी या घाटावर २१ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या किमान ७ ते ८ मृतदेहांवर सप्टेंबर महिन्यात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबरपासून मृत्यूची संख्या वाढल्याने त्रासदायक ठरत आहे.

लॉकरमध्ये पडल्याहेत अस्थी
शहरातील काही घाटांवर लॉकरची सुविधा उपलब्ध आहे. येथे राख शिरविल्यानंतर लॉकरमध्ये अस्थी ठेवण्यात येतात. अनेक महिन्यांपासून येथील लॉकरमध्ये अस्थी पडल्या आहेत. आस्थेचा विषय असल्याने, त्या नष्ट करणे शक्य नाही.

तीन दिवस पडून असते राख
मृतदेहावर अग्निसंस्कार झाल्यानंतर किमान ३ दिवसात राख विसर्जित करावी लागते. सध्या घाटावर तीन दिवस राख पडून राहिल्यास येणाऱ्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओटासुद्धा उपलब्ध राहत नाही. अशावेळी घाटावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची होत आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहाला परत पाठविता येत नाही, त्यामुळे कुठेतरी तडजोड करावी लागत आहे.

गंगाबाई घाट
महाल, शिवाजीनगर भागात येणाऱ्या गंगाबाई घाट येथे मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्यासाठी २५ ओटे आहेत. या घाटावर इतवारी, महाल, लकडगंज, नंदनवन, वाठोडा, सक्करदरा, रेशीमबाग या परिसरातून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असतात. येथे अंत्यसंस्कार, शवदाहिनी, गट्टू आणि प्रेतांना पुरण्याचीही व्यवस्था आहे. शहरातील जुना आणि प्रमुख मोठा घाट असल्याने येथे एरवीही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठीची गर्दी असते. कोरोनापूर्वी येथे महिन्याकाठी सरासरी ३०० मृतदेहांचे अंत्यसंस्कार होत असत. कोरोना काळापासून हा आकडा प्रचंड वाढला आहे. ऑगस्ट महिन्यात एकट्या शवदाहिनीमध्ये १६२ प्रेतांचे अंत्यसंस्कार झाले. इतर ओट्यांवर हा आकडा पाचशेच्या वर जातो. सप्टेंबरमध्ये एकट्या शवदाहिनीत शनिवारपर्यंत ६२ प्रेतांचे अंत्यसंस्कार झाले होते आणि ओट्यांवर दीडशेच्या वर प्रेतांचे अंत्यसंस्कार झाले. येथे सद्यस्थितीला दररोज ३० ते ३५ प्रेत येत आहेत. त्यातील २० ते २५ प्रेत कोरोना संक्रमित असतात. शवदाहिनीमध्ये दररोज पाच ते सात प्रेतांचे अंत्यसंस्कार होत आहेत. रात्री उशिरापर्यंत हे क्रियाकर्म सुरू असते.

मानेवाडा घाटावर कोरोनाचे १२ मृतदेह
मानेवाडा घाटावर दररोज कोरोनाच्या १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहेत. या घाटावर एकूण ११ ओटे आहेत. कोरोनाच्या पूर्वी या घाटावर दररोज १० ते ११ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. परंतु आता दररोज किमान १२ कोरोनाचे मृतदेह येत आहेत. ऑगस्ट महिन्यात या घाटावर जवळपास ३२३ मृतदेह आले. यातील २०० मृतदेह कोरोना रुग्णांचे होते. एका ओट्यावर तीन मृतदेहांचे अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. काही नातेवाईकांना सकाळीच मृतदेहाची राख हवी असते. त्यांनी मृतदेह जाळलेल्या जागेवर पाणी टाकल्यास राख थंड होते. परंतु ज्यांना तीन दिवसांनी राख न्यायची असते. त्यांच्यासाठी राख ठेवण्याची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. या घाटावरील कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने सॅनिटायझर, मास्क, पीपीई किटची व्यवस्थाही केलेली आहे.


मोक्षधाम घाटावर वाईट परिस्थिती
मोक्षधाम घाटावर एकू ण १७ ओटे आहेत. दररोज येथे २५ ते ३० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनापूर्वी या घाटावर १० ते ११ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत होते. ऑगस्ट महिन्यात जवळपास ३१० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील १६० कोरोनाचे मृतदेह होते. ओट्याला लागूनच प्लॅटफॉर्म आहे. ओट्यावर जागा नसल्यास या प्लॅटफॉर्मवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. लाकडांनी अंत्यसंस्कार करायचे असल्यास या प्लॅटफॉर्मवर मृतदेहांना जागा देण्यात येते. परंतु ज्यांना गोवरीने अंत्यसंस्कार करायचे असल्यास त्यांना ओटे देणे आवश्यक असते. येथे शवदाहिनी सुद्धा आहे. परंतु मृतदेहाचे अंत्यसंस्कार शवदाहिनी, लाकूड किंवा गोवरीने करायचे याचा निर्णय नातेवाईक घेतात. येथेही तिसऱ्या दिवशी राख न्यायची असल्यास राख ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा रुग्ण असला तरीसुद्धा त्याची राख घेण्यासाठी नातेवाईक येत असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. या घाटावरही कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, पीपीई कीट, मास्क पुरविण्यात येत आहेत.

 

Web Title: Ghats are insufficient for cremation in Nagpur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.