लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून गुन्हेगारांच्या एका टोळीने प्रतिस्पर्धी टोळीतील युवकावर हल्ला केला. मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील ताजनगर झोपडपट्टीत ही घटना घडली. वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गँगवॉर सुरु झाल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताजनगर झोपडपट्टीत बॉबी ऊर्फ मेलवीन जॉन याची एक टोळी, तर बाबा टायगर, नवाब खान, सोनू टुंडा, अरवेज, संकेत कन्हेरे, गोलू मिर्झा, शोबू मिर्झा, आणि मोंटू चंद्रिकापुरे यांची दुसरी टोळी आहे. बाबा टायगरला असा संशय होता की, त्याचा प्रतिस्पर्धी जॉन हा पोलिसांना त्याच्या अवैध धंद्यांची माहिती देत असतो. जॉनविरुद्ध मारहाण व इतर गुन्हेदेखील दाखल आहेत. ११ मार्च रोजी बाबा टायगर आणि त्याच्या साथीदारांनी जॉनला चर्चेच्या बहाण्याने कॅनरा बँकेजवळ बोलावले. तिथे टायगर आपल्या साथीदारांसह तलवार, चाकू, हॉकी स्टीकने सज्ज होता. त्यांनी जॉनवर पोलिसांना टीप देत असल्याचा आरोप करीत हल्ला चढविला. ते जॉनला जिवे मारण्याच्याच तयारीत होते. मात्र, ऐनवेळी जॉनचे साथीदारही धावले. दोन्ही टोळ्यांतील लोकांनी एकमेकांवर हल्ला केला. त्याचवेळी गुन्हे शाखेचे पोलीस व मानकापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून आरोपी जॉनला जिवे मारण्याची धमकी देऊन पळाले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
सूत्रांनुसार, ताजनगर झोपडपट्टीत अवैध धंदे चालविले जात आहेत. या धंद्यात आरोपींचाही समावेश आहे. त्यांना असा संशय होता की, बॉबी जॉन हा पोलिसांसाठी खबरी म्हणून काम करतो. बाबा टायगर हा कुख्यात गुन्हेगार आहे. तो मटका अड्डा चालवतो. अलीकडेच तो हत्येच्या प्रकरणात तुरुंगातून जामिनावर बाहेर आला आहे. त्यामुळेच बॉबी पाेलिसांत तक्रार करण्यास मागे-पुढे पाहात होता. पोलिसांनी दबाव टाकला तेव्हा तो तयार झाला. त्याच्या तक्रारीवरून टायगर व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.