लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुंडांनी शस्त्राच्या धाकावर तीन आठवड्यात दुसऱ्यांदा हैदोस घालून वाहने, दुकान, बारमध्ये तोडफोड करण्याची घटना घडल्याने गणेशपेठ परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. गणेशपेठ पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच गुंड वारंवार असे प्रकार करण्याची हिंमत दाखवत आहेत. त्यामुळे नाकर्त्या पोलिसांवरही कडक कारवाई करावी, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.कुख्यात गुंड शेख अजहर शेख मजहर(वय २२, रा. लोधीपुरा, बजेरिया)आणि आमिर खान जाकीर खान (वय २१, रा. गुलशननगर) या दोघांनी आपल्या अल्पवयीन साथीदारांसह रविवारी मध्यरात्रीपासून गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात प्रचंड हैदोस घातला. एका दुकानदाराच्या गळ्याला घातक शस्त्र लावून त्याच्याकडून रक्कम लुटली तर, बाजुच्या दुकानाचे शोकेस फोडले. बीअर बारमध्येही तोडफोड करून या भागातील २६ वाहनांचीही तोडफोड केली.१५ जुलैला अशाच प्रकारची घटना याच भागात घडली होती. त्या घटनेतील कुख्यात गुंड राजा आणि साथीदारांना अद्याप अटक करण्यात गणेशपेठ पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे की काय, ४ जुलैला मध्यरात्री गुंडांच्या दुसऱ्या टोळीनेही तशीच हिंमत केली. कुख्यात अजहर आणि आमिर हातातील सत्तूर दाखवत दुकानदार, बीअर बार, वाहनचालकांना धमकावत होते. प्रत्येकाला ते आम्ही या भागातील भाई असल्याचे सांगून खंडणी मागत होते. दारूच्या नशेत टुन्न असलेल्या या गुंडांनी केवळ दुकानदार, वाहनचालक आणि बारच्या संचालकालाच नव्हे तर रस्त्यावर पाणीपुरी, आमलेट विकणाऱ्यांनाही मारहाण केली. त्यांचे हातठेले पलटवले. २६ वाहनांची तोडफोड केली. सुमारे अर्धा ते पाऊण तास त्यांचा हैदोस सुरू होता आणि गणेशपेठ ठाण्याचे सुस्तावलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना त्याचा थांगपत्ता नव्हता. त्यामुळे दुकानदार, वाहनचालकच नव्हे तर सामान्य नागरिकांमध्येही पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीविषयी रोष निर्माण झाला आहे.निष्क्रिय पोलिसांची हकालपट्टी कराअकार्यक्षम तसेच निष्क्रिय पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याची हकालपट्टी करून तेथे कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी नेमावे, अशी भावना आज या भागातील नागरिकांनी पत्रकारांकडे व्यक्त केली. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात एका अल्पवयीन आरोपीसह तिघांचा सहभाग आहे. त्यातील अजहर आणि आमिर हे निर्ढावलेले गुंड आहेत. त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र, गणेशपेठ पोलिसांनी सोमवारी केवळ अजहरचेच नाव माहिती कक्षाला कळविले होते. या आरोपींना आणखी काही जणांनी मदत केल्याची चर्चा आहे. त्यांनाही अटक करून कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी गणेशपेठेतील नागरिकांनी केली आहे.
नागपुरात तीन आठवड्यात गुंडांचा दुसऱ्यांदा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:36 IST
गुंडांनी शस्त्राच्या धाकावर तीन आठवड्यात दुसऱ्यांदा हैदोस घालून वाहने, दुकान, बारमध्ये तोडफोड करण्याची घटना घडल्याने गणेशपेठ परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. गणेशपेठ पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच गुंड वारंवार असे प्रकार करण्याची हिंमत दाखवत आहेत. त्यामुळे नाकर्त्या पोलिसांवरही कडक कारवाई करावी, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
नागपुरात तीन आठवड्यात गुंडांचा दुसऱ्यांदा हैदोस
ठळक मुद्देगणेशपेठेतील नागरिकांमध्ये प्रचंड संताप : पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रोष