नागपूर : १९२० साली डिसेंबर महिन्यात नागपूरला झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरले होते. या अधिवेशनातून काँग्रेसच्या कार्याची आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनाची दिशाच बदलून टाकली. या अधिवेशनापासूनच गांधीजींचे नेतृत्व काँग्रेस प्रतिनिधी आणि जनमानसानेही स्वीकारले होते. त्यांनी दिलेले सत्य, अहिंसा, स्वराज, असहयोग, चरखा व स्वदेशी हे मूलमंत्र आंदोलनाचे शस्त्र म्हणून स्वीकृत झाले. महत्त्वाचे म्हणजे नागपूर अधिवेशनातच गांधीजींना दिलेल्या ‘महात्मा’ या उपाधीला सर्वमान्यता मिळाली होती.
राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील ‘स्वातंत्र्याचे आंदोलन आणि नागपूर’ या पुस्तकात काँग्रेसच्या या अधिवेशनाची सविस्तर माहिती आपल्याला अभ्यासाला मिळते. त्यावेळी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेचा लढा पूर्ण करून नुकतेच भारतात आले होते आणि चंपारणचा सत्याग्रह यशस्वी केला होता. सहा महिन्यापूर्वीच लोकमान्य टिळक यांचे निधन झाले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांबाबत भारतीयांमध्ये उदासीनता दिसून आली होती व त्यानंतर कोलकाता येथील अधिवेशनातही मरगळ दिसून आली. अशा पार्श्वभूमीवर नागपूर अधिवेशनाने मात्र स्वातंत्र्य लढ्यात उत्साह भरला. त्यावेळी शहरातील क्रॉडक टाऊन (काँग्रेसनगर) येथे अधिवेशनासाठी विशाल मंडप सजविण्यात आला होता. आश्चर्य म्हणजे देशभरातून १६००० च्यावर प्रतिनिधी येथे सहभागी झाले होते. सर्व स्वदेशी परिवेशात होते व बहुतेकांच्या डोक्यावर गांधी टोपी होती. नंतर हीच टोपी राष्ट्रीय सेवेचे प्रतीक ठरली. रेल्वे स्टेशनपासून अधिवेशन स्थळापर्यंत मोठा जुलूस काढण्यात आला होता. अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले विनय राघवा चारियार हे नेतृत्व करीत होते. गांधीजी यांच्यासह मोतीलाल नेहरू, पं. नेहरू, पं. महामना, मदन मोहन मालवीय, लाला लाजपतराय, सी.आर. दास, एम.ए. जिना, मौलाना आझाद, मोहम्मद व शौकत आली आदी सर्व मोठे नेते या अधिवेशनासाठी हजर झाले होते. व्यासपीठावर लोकमान्य टिळकांचे तैलचित्र लावण्यात आले होते. प्रतिनिधी व प्रेक्षकांसह २२००० च्यावर लोक अधिवेशनात हजर झाले होते. इंग्लंडमधील मजूर पक्षाचे सदस्यही या अधिवेशनात सहभागी झाले होते.
या अधिवेशनातच गांधीजींकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपविले होते. संपूर्ण अधिवेशनाला गांधीमय रूप आले होते. त्यांनी मांडलेले संपूर्ण स्वराज, स्वदेशी व ब्रिटिश सरकारला असहकार्य करण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते स्वीकृत करण्यात आले. गांधीजींनी स्वत: हे प्रस्ताव विस्तृतपणे समजाविले. आतापर्यंत एका वर्ग संघटनेपुरती मर्यादित राहिलेली काँग्रेस व स्वातंत्र्य चळवळ महात्मा गांधी यांनी जनसामान्यांमध्ये नेऊन ठेवली होती व या नव्या नेतृत्वाच्या प्रवाहाला नागपूर अधिवेशन हे फलदायी ठरले होते. अधिवेशनाचा संपूर्ण परिसर ‘गांधी’ नावाच्या ‘महात्मा’च्याजय जयकाराने दणाणून गेला होता. देशाचे राजकारण व स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या नेतृत्वाचा उदय नागपूर अधिवेशनातून झाला होता.
असहकार आंदाेलनाची रूपरेखा ठरली
असहकार आंदोलनाची सविस्तर भूमिका त्यांनी समजावली. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा-महाविद्यालयात जाणे बंद करावे. याप्रमाणे शिक्षक, प्रबंध संचालक व आश्रय दात्यांनी मदत बंद करावी, वकिलांनी, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी असहकार्य सुरू करावे, एवढेच नाही तर सेना व पोलीस विभागानेही राष्ट्रभक्ती जागवून असहकार्याला सुरुवात करण्याचे आवाहन करण्यात आले. व्यापारी व व्यावसायिकांनी विदेशी मालाचा बहिष्कार करून स्वदेशी वस्तूंना विक्रीसाठी प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. आणि हे संपूर्ण आंदोलन सत्य आणि अहिंसेच्या मार्गानेच चालविण्याचा आग्रह गांधीजींनी केला. आश्चर्य म्हणजे त्यांच्या या आवाहनाला एकमुखाने मंजुरी प्रदान करण्यात आली. यापूर्वी ज्या नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला त्यांनाही जनमानसांच्या रेट्यापुढे नमावे लागले. एकटे जिना वगळता काँग्रेसचे सर्व प्रतिनिधी या नव्या प्रवाहाला समर्पित झाले होते.