गाेर बंजारा साहित्य, कला अकादमीला राज्य सरकारनं दिली मान्यता

By निशांत वानखेडे | Published: March 17, 2024 05:12 PM2024-03-17T17:12:37+5:302024-03-17T17:12:47+5:30

हरिभाऊ राठाेड, एकनाथ पवार यांच्या प्रयत्नांना यश : ‘लाेकमत’च्या माध्यमातून केला पाठपुरावा

Gaer Banjara Sahitya, Kala Akademi recognized by the state government | गाेर बंजारा साहित्य, कला अकादमीला राज्य सरकारनं दिली मान्यता

गाेर बंजारा साहित्य, कला अकादमीला राज्य सरकारनं दिली मान्यता

नागपूर : आपल्या स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीने बंजारा समाज ओळखला जातो आणि बंजारा कला, संस्कृतीने भारतीय विविधतेला समृद्ध केले आहे. आता या बंजारा साहित्य, संस्कृतीचा अभ्यास व संशाेधनाला अकादमीद्वारे चालना मिळणार आहे. राज्य सरकारने बंजारा कला साहित्य अकादमीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी खासदार हरिभाऊ राठाेड व साहित्यिक एकनाथ पवार यांनी या अकादमीसाठी सातत्याने प्रयत्न केले व ‘लाेकमत’ने त्यांच्या प्रयत्नांचा पाठपुरावा केला आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून महाराष्ट्रात बंजारा भाषिक मोठ्या प्रमाणात आहे. बंजारा लोकसाहित्यातून बंजारा संस्कृतीचा इतिहास उलगडतो. स्वतंत्र बंजारा बोलीतून आज मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंधी आणि गुजराती अकादमीच्या धर्तीवर बंजारा अकादमी स्थापन करण्याची मागणी साहित्य वर्तुळातून होत होती.

सन २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा अकादमीची घोषणा केली होती. परंतु अकादमी थंडबस्त्यात पडल्याने हरिभाऊ राठोड, एकनाथ पवार यांनी राज्याचे मंत्री संजय राठाेड यांच्या पुढाकाराने पुन्हा जाेरकस प्रयत्न लावून धरले. त्याची दखल घेत राज्य शासनाने बंजारा साहित्य संस्कृती व कलाच्या संवर्धनासाठी गोर बंजारा अकादमी स्थापन करण्यास मंजुरी दिली. हा निर्णय बंजारासाठी ऐतिहासिक ठरला. राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतूने शासनाने महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य बंगाली साहित्य अकादमी बरोबरच महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याच्या निर्णय घेतला.

एकनाथ पवार यांची संकल्पना
बंजारा भाषा, साहित्य, संस्कृती व कलांचे संवर्धन व्हावे, इतर भाषिकांच्या साहित्य अकादमी प्रमाणेच बंजाराचा समृद्ध वारसा अबाधित रहावे, तसेच बंजारा भाषेतून साहित्य निर्मितीला चालना मिळावी यासाठी श्रीक्षेत्र पोहरागड, भक्तीधाम येथे बंजारा साहित्य-संस्कृती अभ्यासक एकनाथ पवार यांनी बंजारा अकादमीची सर्वप्रथम संकल्पना ३० मे २०१६ रोजी मांडली होती. सभेत त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत बंजारा अकादमीची गरज व प्रारुप देखील मांडले होते. अखेर सात वर्षांनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या बंजारा भाषिकासाठी स्वतंत्र अकादमी स्थापन करण्याचा निर्णय झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

Web Title: Gaer Banjara Sahitya, Kala Akademi recognized by the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.