नागपूर : एमडी तस्करीमुळे चर्चेत आलेला फर्निचर व्यापारी आणि त्याच्याशी निगडित युवतींची पोलिसांसोबत चांगली ओळख आहे. त्यामुळे एमडीच्या तस्करीत अनेकदा नाव पुढे येऊनही त्यांना अटक करण्यात आली नसल्याने त्यांचे मनसुबे उंचावले होते.
वादग्रस्त व्हिडिओ क्लिपिंग प्रकरणात अटक आरोपीशी निगडित नागरिकांची खरी माहिती घेतली असता धंतोली येथील फर्निचर व्यापारी आणि त्याच्याशी निगडित दोन युवती संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर पोलीस चक्रावले आहेत. या कारणामुळे फर्निचर व्यापारी आणि दोन्ही युवती सतर्क होऊन आपले कृत्य करीत होत्या. सूत्रांनुसार पाच वर्षांपूर्वी एनडीपीएस सेलने एमडी तस्करीचे मोठे रॅकेट पकडले होते. त्यातही तिघे सहभागी असल्याचे स्पष्ट झाले होते. राजनगर येथील रहिवासी युवतीला चौकशीसाठी अनेकदा बोलाविण्यात आले. एनडीपीएस सेलच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी वसुली करून प्रकरणाचा निपटारा केला. त्यानंतर जून २०१९ मध्ये कुख्यात मुजाहिद अहमद आणि इमरान डल्लाला गिट्टीखदानमध्ये १० लाख रुपये किमतीच्या ५५ ग्रॅम एमडीसह पकडण्यात आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी, फर्निचर व्यापारी आणि त्याच्याशी निगडित दोन युवतींचा यात सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणातही तिघांविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. एमडीच्या अधिक सेवनामुळे काही दिवसांपूर्वी एमडी व्यापाऱ्याची प्रकृती बिघडली होती. त्याने एका न्युरो फिजिशियनकडून उपचारही घेतला होता. त्यानंतर त्याचे व्यसन कमी झाले नाही. फर्निचर व्यापाऱ्याने काही दिवसांपुर्वी रेस्टॉरंट सुरू केले आहे. येथेही एमडीचे सेवन केल्याचा संशय आहे. फर्निचर व्यापाऱ्याशी निगडित युवतींची जरीपटक्यातील गारमेंट व्यापाऱ्याशीही मैत्री आहे. हा व्यापारीही अनेक दिवसांपासून एमडीच्या व्यवसायात सक्रिय आहे. त्याला कुटुंबीयांचा आश्रय आहे. यामुळे गारमेंट व्यापारी बिनधास्त आहे. त्यालाही एकेकाळी चौकशीसाठी एनडीपीएस सेलने बोलावले होते.
...............