उद्यापासून आकाशात ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’चे घ्या दर्शन
By निशांत वानखेडे | Published: March 6, 2024 04:51 PM2024-03-06T16:51:46+5:302024-03-06T16:52:22+5:30
१६ देशांनी तयार केलेली प्रयाेगशाळा, दाेन सेकंदात करते नागपूर-मुंबई प्रवास.
निशांत वानखेडे, नागपूर : अंतराळातील घडामाेडींचा अभ्यास व संशाेधन करण्यासाठी जगातील १६ देशांनी मिळून एक ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ तयार केले आहे. ही एक प्रकारची अंतराळातील प्रयाेगशाळा हाेय. हे केंद्र अवघ्या दाेन सेकंदात नागपूर ते मुंबई प्रवास करेल, इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीभाेवती फिरते. आकाशात भ्रमण करणाऱ्या या स्पेस स्टेशनचे दर्शन शुक्रवारपासून पाच दिवस भारतीयांना दर्शन करता येणार आहे.
हे स्पेस स्टेशन सध्या आपल्या भागातून जात असून ते उघड्या डाेळ्यांनी सहज पाहता येईल. ८ मार्चपासून पाच दिवस हा अनाेखा नजारा आकाशात दिसणार आहे. ८ मार्चला पहाटे ६.०६ वाजता, ९ मार्चला रात्री ८.१६ वाजता, १० राेजी पुन्हा पहाटे ६.०६ वाजता, ११ ला पहाटे ५.२० वाजता व रात्रभ ८.१७ वाजता आणि १२ मार्च राेजी ७.२८ वाजता आकाशात सहा मिनिटे या केंद्राचे नागरिकांना दर्शन घेता येईल. त्यानंतर मात्र हे स्पेस स्टेशन दिसणार नाही. या मानवनिर्मित केंद्राशिवाय मार्च महिन्यात आकाशात इतरही नैसर्गिक घटना बघायला मिळणार आहेत. त्याचे दर्शन खगाेलप्रेमी व नागरिकांनी घ्यावे, असे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
चंद्रा सोबत दोन ग्रहांची युती : सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी शूक्र ग्रह आणि लालसर रंगाचा मंगळ ग्रहाची ८ मार्च महाशिवरात्रीच्या पहाटे पूर्व आकाशात चंद्रकोरी जवळ येणार असून या दाेन ग्रहांची चंद्रासाेबत युती बघता येईल.
बुध व शनी या दोन ग्रहांचे उदय : सूर्याला सर्वात जवळ असलेला बुध ग्रहाचा उदय १० मार्च रोजी सूर्यास्तानंतर पश्चिमेस आणि सूर्यमालेतील सर्वात सुंदर व वलयांकित असलेला शनी ग्रह १४ रोजी पहाटे पूर्व क्षितिजावर उदय होत असुन दूर्बिणीतून याच्या मनोहारी वलय बघता येईल. मात्र काही कालावधीनंतर पृथ्वी, सूर्य व शनी ग्रह यांच्या स्थितीतील बदलामुळे असा अनुपम आकाश नजारा बघता येणार नाही.