लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : मजुरी करणारे तीन मित्र दारू प्यायल्यानंतर एकमेकांना अश्लील शिवीगाळ करू लागले आणि वादाला ताेंड फुटले. त्यातच दाेघांनी खुर्चीवर बसलेल्या एका मित्रावर कुदळ व फावड्याने वार करून त्याचा खून केला. एवढेच नव्हे तर त्या दाेघांनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह खड्ड्यात टाकला. रक्ताचे डाग पाण्याने साफ करून दाेघांनी तिथून पळ काढला. मात्र, पाेलिसांनी त्या दाेघांना ताब्यात घेत अटक केली. ही घटना काेराडी (ता. कामठी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चक्कीखापा शिवारातील लाॅनमध्ये शुक्रवारी (दि. १६) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
गब्बर ऊर्फ सचिन इरपते (४०, रा. संजय गांधी नगर, हुडकेश्वर राेड, नागपूर) असे मृताचे तर रवी नारायण पारडे (५२, रा. विष्णूमता नगर, सातपुडा ले-आऊट, हुडकेश्वर राेड, नागपूर) व सुभाष सखाराम भाकरे (५८, रा. म्हाळगीनगर, हुडकेश्वर राेड, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. तिघेही मित्र असून, मजुरी करायचे. चक्कीखापा येथे साेहेल राणा यांची सेलिब्रेशन लाॅन आहे. त्या लाॅनमध्ये तिघेही मजूर म्हणून कामाला हाेते.
तिघेही शुक्रवारी रात्री मनसाेक्त दारू प्यायले. दारू चढल्यानंतर त्यांनी एकमेकांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. सचिन अश्लील शिवीगाळ करीत असल्याने रवी व सुभाषचा राग अनावर झाला. त्यांनी सचिनला खुर्चीवर बसवून ठेवत त्याच्या डाेक्यावर कुदळ व फावड्याने वार केले. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच लाॅनमधील खड्ड्यात त्याला ढकलून देत पळ काढला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला. शिवाय, दाेन्ही आराेपींना काही तासात नागपूर शहरातून ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी काेराडी पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक कृष्णा शिंदे करीत आहेत.
....
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दाेन्ही आराेपींनी घटनास्थळ साेडण्यापूर्वी स्वत:साेबतच मृत सचिनच्या अंगावरील कपडे, कुदळ, फावडे, जमीन व तेथील शेडवर पडलेले रक्ताचे डाग पाण्याने साफ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी मृतदेह लाॅनमधील खड्ड्यात ढकलला.
...
तिघेही सराईत गुन्हेगार
मृत सचिन तसेच आराेपी रवी व सुभाष सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. सचिन विराेधात अजनी (नागपूर) पाेलीस ठाण्यात भादंवि ३२५ व ३२६, ३४ तसेच रवीविरुद्ध भादंवि ३०२, ३४ आणि सुभाषविरुद्ध सक्करदारा (नागपूर) पाेलीस ठाण्यात भादंवि ३०७, ३०२, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हे नाेंदविले आहेत. हे गुन्हे अनुक्रमे १९९७, २००२, २०१० व १९९३ सालचे आहेत.