बैस हत्याकांडातील निष्काळजीपणा महागात पडला :
वाचवता आला असता जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भय्यालाल बैस हत्याप्रकरणात निष्काळजीपणा केल्याबाबत मानकापूर ठाण्यातील पीएसआयसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईमुळे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
९ मार्च रोजी सायंकाळी ४.४० वाजता गोरेवाडा येथील एका निर्जन परिसरात लोखंडे ले-आऊट येथील रहिवासी असलेले ६४ वर्षीय बैस यांचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक नजरेतच त्यांची हत्या केल्याचे दिसून येत होते. परंतु पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली, नंतर ११ मार्च रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला. बैस ८ मार्च रोजी सकाळी बेपत्ता झाले होते. ९ मार्च रोजी सकाळी पोलिसांना ते जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली होती. यानंतरही पोलिसांनी कुठलीही तत्परता दाखविली नाही. परिणामी त्यांचा मृत्यू झाला. लोकमतने शुक्रवारच्या अंकात पोलिसांचा निष्काळजीपणा उघडकीस आणला. या प्रकरणाला गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचे उघडकीस आले. यानंतर मानकापूर पोलीस ठाण्यातील पीएसआय लाकडे, पोलीस कर्मचारी रोशन यादव, राहुल बोटरे व मुख्यालयाचे संजय पांडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
सूत्रानुसार संजय पांडे पोलीस मुख्यालयात नियुक्त आहे. ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता तो बाईकने कामावर जात होता. घटनास्थळी पडून असलेल्या भय्यालाल बैस यांच्याकडे त्याची नजर गेली. त्याने बैस यांना पाणीही पाजले आणि मानकापूर पोलिसांना याची सूचनाही दिली. संजयकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतरही पोलीस कर्मचाऱ्यांनी भय्यालाल बैस यांना रुग्णालयात पोहोचविले नाही. परिणामी खूप वेळ जखमी अवस्थेत पडून असल्याने बैस यांचा मृत्यू झाला. सायंकाळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्यांचा मृतदेह दिसून आल्याने त्यांनी मानकापूर पोलिसांना सूचना दिली. तेव्हा कुठे पोलीस घटनास्थळी पोहोचले. मानकापूर पोलीस सकाळीच घटनास्थळी पोहोचले असते तर बैस यांचा जीव वाचू शकला असता तसेच आरोपीचाही पत्ता लागला असता. त्याचप्रकारे पांडे हे स्वत:ही पुढाकार घेऊन बैस यांना रुग्णालयात पोहोचवू शकले असते. पोलीस येईपर्यंत बैस यांच्याजवळ राहणे त्यांचेही कर्तव्य होते, परंतु ते तेथून निघून गेले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणामुळे एकाचा जीव गेला. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेत निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, चार दिवस लोटूनही बैस यांच्या हत्येचा अद्याप कुठलाही सुगावा लागू शकलेला नाही. गुन्हे शाखा व मानकापूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.