Four inspectors of Nagpur RTO transferred to Dhule | नागपूर आरटीओतील चार निरीक्षकांची धुळ्यात बदली
नागपूर आरटीओतील चार निरीक्षकांची धुळ्यात बदली

ठळक मुद्देतडवी लाच प्रकरण : धुळे आरटीओतील अकराही निरीक्षकांच्या राज्यात बदल्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : धुळे आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्तांनी या कार्यालयातील ११ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या राज्यातील विविध आरटीओ कार्यालयात केल्या, तर त्यांच्या जागेवर नागपूर शहरमधून एक, नागपूर ग्रामीणमधून तीन, अमरावतीमधून तीन, लातूरमधून दोन, बारामतीमधून एक व उस्मानाबाद आरटीओ कार्यालयातून एक मोटार वाहनरिक्षकांची बदली करण्यात आली आहे. कार्यालयाने बदल्यांना ‘सेवा वर्ग’ हे नाव दिले असलेतरी ते कधीपर्यंत राहतील याचा उल्लेख नाही. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.
धुळे आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या तपासणी नाक्यावर नेमणुकीसाठी एका मोटार वाहन निरीक्षकाकडून साडेचार लाखांच्या लाचेची मागणी करणारे परवेज तडवीला नुकतेच नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. विशेष म्हणजे, दोन महिन्यांत तडवीला लाच प्रकरणात दुसऱ्यांदा अटक झाली. परिवहन आयुक्त कार्यालयाने याची दखल घेतली. प्रकरण सामान्य होईपर्यंत येथील ११ मोटार वाहन निरीक्षकांची राज्यात विविध आरटीओ कार्यालयात बदल्यांचे सोमवारी निर्देश दिले. तर त्यांच्या ठिकाणी नागपूर शहर आरटीओतील सौरभ पाटील, नागपूर ग्रामीण आरटीओतील संजयकुमार पेंढारकर, विजयकुमार महाजन, राजेश बोराळे, अमरावती आरटीओतील हेमंत खराबे, हितेश दावडा, नितीन घोडके, लातुर आरटीओतील बजरंग कोरावले, संदीप शिंदे, बारामती उपआरटीओतील सुरेश तुरकणे व उस्मानाबाद उपआरटीओतील अतुल नांदगावकर यांची बदली करण्यात आली. बदल्यांच्या या आदेशाने आरटीओ कार्यालयात चर्चेला पेव फुटले आहे. धुळे आरटीओ कार्यालयातील लाच प्रकरणाचा फटका इतर कार्यालयांना बसल्याने काही निरीक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे, अमरावती व नागपूर ग्रामीण आरटीओतील तब्बल तीन-तीन मोटार वाहन निरीक्षकांना धुळे येथे पाठविण्यात आल्याने आणि त्यांच्या मोबदल्यात कुणीच न दिल्याने कामकाज प्रभावित होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


Web Title: Four inspectors of Nagpur RTO transferred to Dhule
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.