नागपुरात दर दिवसाला चार मुली-महिला होत आहेत ‘गायब’

By योगेश पांडे | Published: May 16, 2023 08:00 AM2023-05-16T08:00:00+5:302023-05-16T08:00:11+5:30

Nagpur News मागील चार महिन्यांत नागपुरातून नऊशेहून अधिक लोक बेपत्ता झाल्याच्या किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील अर्ध्याहून अधिक तक्रारी महिला हरविल्याच्या होत्या.

Four girls and women are going 'missing' every day in Nagpur. | नागपुरात दर दिवसाला चार मुली-महिला होत आहेत ‘गायब’

नागपुरात दर दिवसाला चार मुली-महिला होत आहेत ‘गायब’

googlenewsNext

 

योगेश पांडे

नागपूर : मागील चार महिन्यांत नागपुरातून नऊशेहून अधिक लोक बेपत्ता झाल्याच्या किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील अर्ध्याहून अधिक तक्रारी महिला हरविल्याच्या होत्या. आकडेवारीनुसार या कालावधीत साडेचारशेहून अधिक मुली किंवा महिला बेपत्ता झाल्या व याची दिवसाची सरासरी चार मुली किंवा महिला इतकी होती. या संख्येकडे लक्ष टाकले असता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ९१२ लोक हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ४७१ महिला होत्या. त्यातही १८ वर्षे किंवा त्याहून कमी वय असलेल्या मुलींचा आकडा चिंताजनक आहे. चार महिन्यांत ३६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यातील बहुतांश मुली घरातून निघून गेल्या होत्या. घरातून निघून जाण्याची वेगवेगळी कारणे होती.

 

बेपत्ता होण्याची प्रमुख कारणे

- प्रेमप्रकरण

- पैशांची चिंता

- घरात होणारे वाद

- अभ्यास किंवा लग्नासाठी दबाव

- नातेवाइकांशी झालेले भांडण

- घरातील वातावरण

- घरात होणारा छळ

- आजारपणाचा त्रास

- बाहेरील जगाचे आकर्षण

 

विसंवाद, अनावश्यक दबाव ठरतोय धोकादायक

सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याने काही मुली प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकतात. तर अनेक मुली घरच्यांच्या दबावाला घाबरून घर सोडतात. अल्पवयीन मुलींशी पालकांनी योग्य संवाद साधणे अत्यावश्यक असते. त्यांचे मित्रमैत्रिणी, इतर सहकारी यांची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट खटकली तर त्यांना विश्वासात घेऊन विचारणे योग्य ठरते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या वयात अनावश्यक दबाव टाकणे टाळले पाहिजे.

२० महिला तर मुलांसह बेपत्ता

‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार चार महिन्यांत २० महिला या त्यांच्या लहान मुला-मुलींसह बेपत्ता झाल्या. या सर्वच महिला विविध कारणांमुळे घरातून निघून गेल्या. गृहकलह, सासरच्यांकडून होणारा छळ, नवऱ्याकडून होणारा त्रास ही यामागची प्रमुख कारणे होती.

 

Web Title: Four girls and women are going 'missing' every day in Nagpur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.