लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरात काळ्या ताेंडाच्या माकडांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. ही माकडे हल्ला करीत किंवा चवताळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका माकडाने हल्ला चढवीत चावा घेतल्याने माजी नगराध्यक्ष गजानन भेदे जखमी झाले आहेत. ही घटना रामटेक शहरातील राखी तलाव परिसरात साेमवारी (दि. ४) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
गजानन भेदे नेहमीप्रमाणे साेमवारी सायंकाळी राखी तलाव परिसरात फिरायला गेले हाेते. त्यातच झाडावरील एका माकडाने त्यांच्या अंगावर उडी मारली. ते खाली काेसळताच त्या माकडाने गजानन भेदे यांच्या उजव्या मांडीला चावा घेतला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावले. त्यामुळे माकड लगेच झाडावर चढले. नागरिकांनी त्यांना लगेच शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्यांच्या जखमेला आठ टाके लावण्यात आले असून, त्यांना ॲण्टिरेबिजचे इंजेक्शन लावण्यात आल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.
रामटेक शहर व परिसरात काळ्या ताेंडाच्या माकडांची संख्या वाढली असून, त्यातील काही माकडे पिसाळलेली आहेत. ते माणसांवर हल्ला चढवित असून, चावा घेतात. या माकडांनी २२ डिसेंबर २०२० राेजी शिक्षक नरेंद्र डबीर, शाहील झलपुरे, कालिदास पतसंस्थेचे व्यवस्थापक सहारे यांना चावा घेतला हाेता. त्यामुळे माकडांनी मागील काही दिवसात एकूण आठ जणांना चावा घेत जखमी केले आहे. वाढत्या घटनांमुळे नागगरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
....
या माकडांना पकडण्यासाठी नागपूरहून रेस्क्यू टीमला बाेलावले आहे. काही ठिकाणी पिंजरा व जाळे लावण्यात आले. परंतु, त्यांना पकडणे अद्याप शक्य झाले नाही. राखी तलाव परिसरात त्यांचा वावर अधिक असल्याने या भागात वन कर्मचाऱ्यांची गस्त लावली आहे. माकडांनी हल्ला केल्यास अथवा चावा घेतल्यास नागरिकांनी लगेच वनविभागाला कळवावे.
- देवेंद्र अगडे,
प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी.