नागपूर : बोगस दस्तऐवजांच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या एका संस्थेच्या सचिवाला पोलिसांनी रात्री दोन वाजता अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणात पहिल्यांदाच एखाद्या संस्थेच्या सचिवावर कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे त्याचे सचिवपदाचा मुद्दादेखील न्यायाधिकरणात गेला आहे.राजू केवलराम मेश्राम (५९, अर्जुनी मोरगाव, भंडारा) असे संबंधित संस्थाचालकाचे नाव आहे. त्याला नागपुरातून पोलिसांनी रविवारी रात्री दोन वाजता अटक केली. मेश्राम हा स्वत: अर्जुनी मोरगाव येथील पिंपळगावमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेत सचिव होता. संस्थेतील वादांतून हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांपर्यंत गेले होते व त्याला तेथून बडतर्फ करण्यात आले होते. त्याविरोधात त्याने न्यायाधिकरणात दाद मागितली आहे. राजू मेश्रामची ‘लिंक’ बोगस दस्तावेज बनविणारा शिक्षक महेंद्र म्हैसकर याच्यासोबत होती. मेश्रामची पत्नी परसतोडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा येथे मुख्याध्यापिका आहे. त्याच शाळेत तेथे शिक्षक आहे.म्हैसकर हा बोगस दस्तावेज बनवितो याची कल्पना मेश्रामला होती. अटक करण्यात आलेला मुख्याध्यापक पराग पुडके याचे वडील नानाजीसोबत राजू मेश्रामची ओळखी होती. आपल्या मुलाचा कुठेतरी जुगाड करायचा आहे असे पुडकेने मेश्रामला सांगितले. तेव्हा मेश्रामने पुडकेची ओळखी महेंद्र म्हैसकरसोबत करवून दिली. त्यानंतर म्हैसकरने पराग पुडकेचे बोगस दस्तावेज तयार केले होते. म्हैसकरच्या चौकशीतून राजू मेश्रामचे नाव मध्यस्थ म्हणून समोर आले.पोलिसांनी त्याला रविवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास नागपुरातून अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी दिली.
मुख्याध्यापक नियुक्ती घोटाळ्यात पहिल्यांदाच संस्था सचिवावर हंटर, रात्री दोन वाजता पोलिसांनी घेतले ताब्यात
By योगेश पांडे | Updated: April 20, 2025 23:39 IST