- योगेश पांडे नागपूर - एका परिचित महिलेच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करत एका कुख्यात गुन्हेगाराने तिला २० हजारांची खंडणी मागितली. पोलिसांना माहिती दिल्यास कटरने मुलीचा गळा कापण्याचीदेखील धमकी दिली होती. मात्र पोलिसांनी अतिशय तत्परतेने सूत्रे हलवत चिमुकलीची ४५ मिनिटांत सुटका केली व गुन्हेगाराला अटक केली. वर्धा मार्गावर हा प्रकार घडला असून बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
सूर्या उर्फ मिलिंद बघेल (२९, रा. बुटीबोरी) असे आरोपीचे नाव आहे. तो कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरोधात हिंगणा पोलीस ठाण्यात खुनाचादेखील गुन्हा दाखल आहे. अपहरण झालेल्या चिमुकलीची आई त्याच्या परिचयाची होती. आरोपीला अनेक व्यसन असून त्यासाठीच त्याला पैसे हवे होते. रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास संबंधित महिला तिची मुलगी व मुलासह वर्धा मार्गावरील तृप्ती हॉटेलजवळ बसची प्रतिक्षा करत उभी होती. तेथे सूर्या एका खाजगी ऑटोने पोहोचला व त्याने जबरदस्तीने मुलीला उचलले आणि तेथून पळ काढला. त्याने तिला फोन करून २० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. जर पोलिसांना कळविले किंवा पैसे दिले नाही तर चिमुकलीला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने हादरलेल्या महिलेने सव्वाचार वाजता बेलतरोडी पोलीस ठाण्याला माहिती दिली. तेथील ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व तीन तपास पथके वर्धा मार्गावर रवाना केली. दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेचा नातेवाईक बोलतो आहे असे सांगून आरोपीला १० हजार रुपये देण्याची तयारी दाखविली. सूर्याने त्याला डोंगरगावजवळ येण्यास सांगितले. मात्र त्याला सुगावा लागल्याने त्याने मोबाईल स्वीच ऑफ केला. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन काढले असता तो बुटीबोरीजवळ असल्याची बाब समोर आली.
दरम्यान, तीनही पथके तिथपर्यंत पोहोचली होती. पोलीस त्याचा शोध घेत असताना सर्व्हिस रोडवर निळ्या रंगाचा फ्रॉक घातलेल्या मुलीसह एक व्यक्ती पायी जाताना दिसला. अपहृत चिमुकलीनेदेखील निळा फ्रॉकच घातला होता. पोलिसांनी त्याला थांबविले व विचारणा केली असता त्याने खोटे नाव सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी लगेच चिमुकलीला सुखरूप तिच्या आईच्या हवाली सोपविले व आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी अवघ्या ४५ मिनिटांत आरोपीचा शोध लावला हे विशेष. ठाणेदार मुकुंद कवाडे, श्रीकांत गोरडे, नारायण घोडके,मनोज गबने विवेक श्रीपाद, सचिन देव्हारे ,अतुल माने, अंकुश चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस अलर्टवर, संयमाने हाताळले प्रकरणनागपुरात लहान मुलांचे अपहरण झाल्यावर हत्या झाल्याच्या घटना भूतकाळात घडल्या आहेत. त्यामुळे या अपहरणाची माहिती मिळताच पोलीस अलर्टवर आले. तिच्या आईने मुलीला नीट बोलता येत नसल्याचे तसेच आरोपी सूर्याविरोधात हत्या तसेच प्राणघातक हल्ल्यांचे गुन्हे दाखल असल्याचे सांगताच ठाणेदार कवाडे यांनी तीनही पथकातील कर्मचाऱ्यांना सिव्हील ड्रेसमध्येच जाण्याची सूचना केली. पोलिसांनी आरोपीशी थेट संपर्क टाळला व महिलेच्या मोबाईलवरूनच एकदा बोलणे केले. जर आरोपीला संशय आला असता त्याने चिमुकलीचा जीव घेण्यासदेखील मागेपुढे पाहिले नसते.