योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पाच प्रमुख तीर्थक्षेत्रांना सरकारने ‘ब’ वर्गाचा दर्जा प्रदान केला आहे. यात कामठी तालुक्यातील खडगाव येथील श्री क्षेत्र हनुमान मंदिर,वडोदा येथील श्री क्षेत्र भवानी मंदिर, भुगावमधील श्री मुकतेश्वर देवस्थान, मौदा तालुक्यातील देवमुंढरीतील श्री शक्तिमाता भवानी तीर्थक्षेत्र व निहारवाणी येथील श्री क्षेत्र बल्याची पहाडी यांचा समावेश आहे.
या निर्णयानंतर संबंधित देवस्थानांना शासनाकडून विकास निधी उपलब्ध होणार असून, रस्ते, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, पार्किंग, निवास व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाचा विस्तार होईल. तसेच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
धार्मिक व सांस्कृतिक उन्नतीसोबतच या निर्णयामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. पर्यटनाचा व्याप वाढल्याने गावोगावी छोट्या व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल, हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवस्था तसेच स्थानिक उत्पादकांना याचा थेट फायदा होईल, असा विश्वास महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.