अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव : तत्काळ मदत कशी करणार?नागपूर : शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार व मेट्रोरिजनमधील नऊ तालुक्यांची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन विभागावर आहे. परंतु विभागाकडे अत्याधुनिक यंत्रणा नाही. त्यातच अनेक वाहने नादुरुस्त असल्याने हा विभाग त्रस्त असल्याचे चित्र आहे. विभागाकडे असलेल्या ३२ फायर टेंडरपैकी १० नादुरुस्त आहेत. तसेच तीन शववाहक, तीन जीप यासह दोन जनरेटर नादुरुस्त आहेत. यातील काही वाहने मागील काही महिन्यांपासून मनपाच्या सिव्हिललाईन येथील मुख्यालयात उभी आहेत. काही वाहनांची दुरुस्ती शक्य नसल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहराचा विस्तार विचारात घेता आग आटोक्यात आणण्यासाठी विभागाला ५० फायर टेंडरची गरज आहे. परंतु जेमतेम २२ गाड्या वापरात आहेत. शहरात ६५ ते ७० मीटर उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. परंतु अशा इमारतीत आग लागल्यास ती आटोक्यात आणणारी यंत्रणा उपलब्ध नाही. १५ ते २० मीटरपर्यंत उंचीच्या इमारतीतील आग आटोक्यात आणणारी उंच सिडीचे एकच वाहन (हायड्रोलिक) आहे. मनुष्यबळाची कमतरता व वाहनांचीही वानवा असल्याने वेळप्रसंगी विभागाकडून तातडीची मदत कशी मिळणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)
अग्निशमनची वाहनेच नादुरुस्त
By admin | Updated: February 10, 2015 00:53 IST