नागपूर : विभागीय आयुक्तांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार सन 2025 या वर्षासाठी नागपूर जिल्हयासाठी १० फेब्रुवारी २०२५ च्या आदेशानुसार विभागीय आयुक्त माधवी यांनी ३ स्थानिक सुटटया जाहिर केलेल्या होत्या यामध्ये दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १४ ऑक्टोबर रोजी देण्यात येणारी स्थानिक सुट्टी वगळण्यात आली होती. त्यामुळे रोष होता.
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने उपायुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी यांची भेट घेऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाची स्थानिक सुट्टी देण्याची मागणी केली होती. त्यांनी याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते अखेर आज १८ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाची स्थानिक सुट्टी जाहीर केली त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंद व्यक्त केला आहे.
यापूर्वी विभागीय आयुक्तांनी सन २०२५ या वर्षासाठी ज्या स्थानिक सुट्टया जाहिर केलेल्या आहेत त्यामध्ये अक्षय तृतिया ३० एप्रिल, महालक्ष्मी पुजन १ सप्टेंबर व नरक चतुर्दशी २० ऑक्टोबरचा समावेश होता.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १४ ऑक्टोबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे, उपायुक्त सामान्य प्रदीप कुलकर्णी यांचे कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे, नरेंद्र धनविजय, प्रभाकर सोनडवले, राजकुमार रंगारी, विभुतीचंद्र गजभिए, नरेंद्र मेश्राम, निरंजन पाटील आदिंनी आभार मानले आहे.