महापौरांचे निर्देश : क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी नागपूर महापालिकेने भारतीय क्रीडा प्राधिकरणा(साई)ला १४०.७७ एकर जमीन ३० वर्षांसाठी लीजवर दिली आहे. मात्र या प्रस्तावित जमिनीवर अतिक्रमण करून घर उभरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी महापौर कक्षात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, आमदार गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सागर मेघे, प्रवीण दटके, नगरसेवक सुनील अग्रवाल, सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, उपायुक्त मिलिंद मेश्राम, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणचे नागपूरचे प्रमुख वीरेंद्र भांडारकर आदी उपस्थित होते.
अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना २४ तासाची नोटीस देऊन त्यांच्याविरुद्ध संयुक्त कारवाई करा, यासाठी मनपा आयुक्त, एनएमआरडीएचे सभापती, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे निर्देश दिले.
संयुक्त कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी कृष्णा खोपडे, प्रवीण दटके यांनी केली. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. प्रकल्पासाठी १४० कोटीची तरतूद असल्याचे वीरेंद्र भांडारकर यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणला १४०.७७ एकर जमीन ३० वर्षांसाठी लीजवर देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी मौजा वाठोडा येथील २८.४६ एकर व तरोडी खुर्द येथील ११२.२९ एकर जमीन प्रस्तावित असल्याची माहिती उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.