दोन तास अग्नितांडव : अनेक झाडे खाकनागपूर : सेमिनरी हिल्स येथील जपानी गार्डनला सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता काही क्षणातच ही आग वेगाने पसरली आणि तिने रौद्र रूप धारण केले. आगीची सूचना अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आगीत अनेक झाडे जळून खाक झाली तर अनेक मोठ्या झाडांना या आगीचा फटका बसला.सेमिनरी हिल्स परिसरात वन विभागाचे जपानी गार्डन आहे. या गार्डनमध्ये बांबू आणि सागाची झाडे आहेत. दिवसभर तीव्र उन असल्यामुळे ही आग काही क्षणातच इतरत्र पसरली. आगीची सूचना सेमिनरी हिल्सचे वन परिक्षेत्र अधिकारी व्ही. सी. गंगावणे यांनी लगेच अग्निशमन विभागाला दिली.त्यावर लागलीच अग्निशमन विभागाचे पाच बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. याबाबत आरएफओ गंगावणे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही आग कुणीतरी खोडसाळपणे लावली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे साहसवन विभागाकडून आगीची सूचना मिळताच कॉटन मार्केट, नरेंद्रनगर, सिव्हिल लाईन्स, गंजीपेठ आणि सुगतनगर येथील अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या आपल्या ताफ्यासह २० मिनिटात घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन विभागाचे कर्मचारी आपले साहस दाखवीत १०० मीटर लांब पाण्याचा पाईप हातात घेऊन थेट जपानी गार्डनमध्ये आग लागलेल्या ठिकाणी शिरले. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी भीमराव चंदनखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग जवळपास पाच किलोमीटरच्या परिसरात पसरली होती. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ती नियंत्रणात आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.रस्त्यावर पसरला धूरजपानी गार्डनला लागलेल्या भीषण आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावर प्रचंड धूर पसरला होता. जपानी गार्डन हे वर्दळीच्या मार्गावर आहे. त्यामुळे लोकांना ही आग दिसताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शिवाय आग विझविण्यास अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी मदत केली.पशुपक्ष्यांना फटकाजपानी गार्डनमध्ये पशुपक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. मात्र, या आगीमुळे या पक्ष्यांनाही त्याचा फटका बसला. अनेक पक्षी या आगीमुळे येथून निघून गेले. शिवाय त्यांची घरटीही आगीत जळाली. विशेष म्हणजे या गार्डनच्याच बाजूलाच वन विभागाचे ट्रान्झिट सेंटर असून त्यामध्ये अनेक वन्य प्राणी आहेत. जर ही आग आटोक्यात आली नसती तर त्या प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात इजा होण्याची शक्यता होती.दोन महिन्यांपूर्वी लागली होती आग : सेमिनरी हिल्स येथील बालोद्यानच्या शेजारी असलेल्या घनदाट सागाच्या जंगलात दोन महिन्यापूर्वी अशीच अचानक आग लागली होती. त्यात जंगलातील पालापाचोळ्यासह अनेक सागाची झाडे जळाली होती. त्याही वेळी वन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ती आग आटोक्यात आणली होती. मात्र, आता लगेच दोन महिन्यात पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. या आगीच्या वाढत्या घटना वन विभाग कशा रोखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जपानी गार्डनमध्ये भीषण आग
By admin | Updated: April 21, 2017 02:42 IST