नागपुरातील मनोरुग्णांनी शोधला शेतीत सृजनाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:03 AM2017-11-18T11:03:47+5:302017-11-18T11:09:00+5:30

नागपूरच्या प्रादेशिक मनोरु ग्णालयातील ३० ते ४० रुग्णांनी भाजीपाल्याची शेती उभी केली आहे तर केळी व पपईची फळबाग फुलविली आहे.

Farming in Nagpur Mental Hospital | नागपुरातील मनोरुग्णांनी शोधला शेतीत सृजनाचा आनंद

नागपुरातील मनोरुग्णांनी शोधला शेतीत सृजनाचा आनंद

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णालय परिसरात फुलवली केळीची बाग प्रादेशिक मनोरुग्णालयाचा अनोखा उपक्रम

सुमेध वाघमारे।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शीच मानसिक संघर्ष सुरू आहे. त्यांच्या उपचारात हातभार लागावा म्हणून त्यांना आवडेल ते काम करू देण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. यातच अनेक रुग्ण हे शेतकरी कुटुंबातील. त्यांना जनावरे, माती-शेती यांच्याशी जोडले तर ते लवकर बरे होतात. याच अनुभवावर गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्या थोडाशा मेहनतीवर तब्बल पाच एकरची शेती फुलत आहे. या जीवांना थोडे समाधान, सृजनाचा आनंद मिळत आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरु ग्णालयातील हे चित्र.
औषधोपचारांच्या क्षेत्रात आमूलाग्र प्रगती झाली. असंख्य जीवघेण्या आजारांवर मानवाने मात केली. मात्र, मनोरुग्णांच्या दुर्दैवाचे दशावतार दूर करण्याला शासन आणि समाजाला यश लाभत नसल्याचे चित्र वेळोवेळी सामोर येत असले तरी, प्रादेशिक मनोरुग्णालय त्यांच्याकडे आहे त्या सोयीत रुग्णांवर कसा प्रभावी उपचार करता येईल याकडे सतत लक्ष देत आले आहे. या रुग्णालयाची क्षमता ९४० रु ग्णांची आहे. सद्यस्थितीत पुरु ष व महिला मनोरुग्ण मिळून ६००वर रुग्ण दाखल आहेत. हे रुग्णालय असले तरी एक कुटुंब म्हणून येथे सर्वच जण वावरतात. येथे उपचारासोबतच डॉक्टर, काही परिचारिका आणि परिचरांकडून मिळत असलेल्या मायेच्या ओलाव्यामुळे अनेक रुग्ण दैनंदिन काम करू शकतात. अशा रुग्णांना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेगवेगळे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात शेतीचे काम हाही एक प्रशिक्षणाचा भाग आहे. याच प्रशिक्षणाच्या मदतीने ३० ते ४० रुग्णांनी भाजीपाल्याची शेती उभी केली आहे तर टाटा ट्रस्टच्या मदतीने मिळालेल्या केळी व पपईच्या रोपामुळे फळबाग फुलविली आहे.

५०० पपईची तर १००० केळीची झाडे
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.एस. फारुखी यांनी सागितले, तीन वर्षांपूर्वी रुग्णालयाच्या १० एकर परिसरात शेती व फळबाग रुग्णांच्या मदतीने केली जायची. परंतु गेल्या तीन-साडेतीन वर्षांत हा उपक्रमच बंद पडला. रुग्णांच्या हितासाठी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हा उपक्रम पुन्हा हाती घेण्यात आला. साधारण पाच एकर जागा शेती व फळबागेसाठी राखीव ठेवण्यात आली. यातील दोन एकर जागेवर भाजीपाला तर उर्वरित तीन एकर परिसरात ५०० पपईची झाडे व १००० केळीची झाडे लावली. शेती व फळबागेचा सांभाळ करण्यासाठी रुग्णालयाचे स्वत:चे माळी आहेत. हे माळी शेतीची आवड असणाऱ्यांना रुग्णांना निंदण, वखरणापासून तर भाजीपाल्याचे रोप टाकण्यापर्यंतचे प्रशिक्षण देतात.


कामात रमणे हेच औषध
मनोरु ग्णालयामध्ये वर्षांनुवर्षे राहणारे रुग्ण आहेत. त्यांच्यावर मनोरु ग्ण असा शिक्का बसल्याने फार कमी नातेवाईक त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन जातात. यामुळे उर्वरित बरे झालेल्या रुग्णांना शेतीसह इतरही विविध २० प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न असतो. या प्रशिक्षणात ते रमतात, खेळतात. हेच त्यांच्यावरचे खरे औषध आहे.
-डॉ. आर.एस.फारुखी
वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरु ग्णालय

Web Title: Farming in Nagpur Mental Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.