लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर: परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरून देण्याबाबत सरकार काहीच हालचाल करत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी आकाशवाणी चौक परिसरात रस्त्यावर संत्री फुकट वाटली. झालेल्या नुकसानाची पाहणी करून योग्य ती भरपाई द्यावी यासाठी शेकडो शेतकरी येथे हजर झाले होते. सडका शेतमाल भेट आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सडकी संत्री रस्त्यावर वाटली. आधी अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी, मका ही पिके सडली आहेत. मोसंबी व संत्रा बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने याचे सर्वेक्षण व पंचनामा करून नुकसान भरपाई जाहीर केली मात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे. आंदोलनाला पोलिसांचे गालबोटउपराजधानीत आयोजित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बुधवारी सकाळी पोलिसांनी अडवल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाची स्थिती निर्माण झाली. परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करावी शेतकºयांना भरपाई मिळावी या हेतूने निवेदन देण्यासाठी विदर्भ आंदोलन समितीचे प्रमुख राम नेवले हे आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले असताना ही घटना घडली.सकाळी ११.३० च्या सुमारास आकाशवाणी चौकात आंदोलनाचे कार्यकर्ते पोहचले असता, पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यापासून रोखले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. याप्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांसोबत झटापट झाल्याचेही वृत्त आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.
उपराजधानीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर वाटली सडकी संत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 13:06 IST