भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे आयोजन : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणीनागपूर : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनी नागपुरात ९ आणि १० डिसेंबरला आंदोलनाचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुले गांधीगिरीचा मार्ग अवलंबत गुलाबाचे फुल आणि मिठाची पुडी देऊन राज्यातील आमदारांना निवेदन देणार आहेत. भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्याचे वचन दिले होते. परंतु त्यांना या वचनाचा विसर पडला. ६ फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टीने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे शक्य नसल्याचे वचनपत्र सुप्रीम कोर्टात दिले. हा शेतकऱ्यांचा विश्वासघात असून या विरुद्ध भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने नागपुरात गांधीगिरी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा द्यावा, शेतकऱ्यांना १८ तास वीज द्यावी, सोयाबीन शेतकऱ्यांना विशेष अनुदान द्यावे, संत्रा उत्पादकांना राजाश्रय द्यावा, शेतकऱ्यांना मासिक पेन्शन द्यावी या मागण्या करण्यात येणार आहेत. आंदोलनानंतर रात्री भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे रात्रकालीन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून कार्यशाळेत शेतकरी चळवळीतील मान्यवर शेतकऱ्यांच्या भावी पिढीला मार्गदर्शन करणार असल्याचे भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे संयोजक अभिजित फाळके यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची मुले आमदारांना देणार गुलाबाची फुले
By admin | Updated: December 6, 2015 03:08 IST