लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थकीत पीककर्ज, नापिकी आणि वन्यप्राण्यांनी फस्त केलेले उर्वरित पीक यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने जंगलातील पळसाच्या झाडाला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी परिसरात गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.नत्थू संपतराव देशमुख (६२, रा. जुनापाणी, ता. काटोल) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे साडेसहा एकर शेती असून, त्यांनी यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. वन्यप्राण्यांचा धुमाकूळ आणि प्रतिकूल वातावरणामुळे त्यांना सोयाबीनचे फारसे उत्पादन झाले नाही. शिवाय, त्यांनी पाच वर्षांपूर्वी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोंढाळी शाखेकडून ७२ हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते. ते कर्ज थकीत राहिल्याने त्यांना कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेकडून पीककर्ज मिळत नव्हते.खरीप हंगाम तोंडावर असताना त्यांना शेतीच्या मशागतीची चिंता सतावत होती. त्यातच ते बुधवारी सायंकाळी घरी कुणालाही न सांगता निघून गेले. रात्री घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी खापरी परिसरातील जंगलात (कक्ष क्रमांक - ६१) पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी दुपट्ट्याने गळफास लावून घेतला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:37 IST
थकीत पीककर्ज, नापिकी आणि वन्यप्राण्यांनी फस्त केलेले उर्वरित पीक यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने जंगलातील पळसाच्या झाडाला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली.
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
ठळक मुद्देखापरी शिवारात लावला गळफास : ७२ हजार रुपयांचे कर्ज थकीत