परिसंवादातील सूर : मुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ रंगकर्मींचा सहभागनागपूर : नाटक असो की चित्रपट, यातील कथा या समाजजीवनाच्या प्रतिबिंबातूनच जन्माला येत असतात. त्यामुळेच त्या पाहताना प्रेक्षकांना ती कथा आपली वाटते, असा सूर कलारंग नाट्यमहोत्साच्या उद्घाटनानिमित्त आयोजित परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केला. ‘मनोरंजन माध्यमं आणि सभोवतालच्या वास्तवाचे प्रतिबिंब’ असा या परिसंवादाचा विषय होता. या परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री रिमा लागू, अभिनेता अरुण नलावडे, अभिनेता प्रशांत दामले सहभागी झाले होते. या परिसंवादाचे निवेदन अभिनेत्री सोेनाली कुलकर्णी यांनी केले. सोनालीने परिसंवादाच्या विषयाला थोडे बाजूला सारत १०००, ५०० च्या नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे कलावंतांना अडचण झाल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, कलावंतांनी चिंता करू नये. लवकरच सगळे सुरळीत होईल. पण, हा निर्णय क्रांतिकारी आहे. यामुळे देशातंर्गत नक्षलवाद आणि सीमेवरील दहशतवादाला मोठा हादरा बसेल. त्यांच्याकडे असलेला पैसा ते बँकेत जाऊन जमा करू शकत नाहीत. त्यामुळे लवकरच त्यांचे खायचे वांदे होतील, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. दुसरे मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझे एक नुकसान झाले. मी मागच्या दोेन वर्षात थिएटरमध्ये जाऊन एकही चित्रपट पाहू शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली. दिलीप प्रभावळकर यांनी दूरदर्शनच्या काळातील त्यांनी वठवलेल्या चिमणरावांच्या भूमिकेने कशी धमाल केली होती याची आठवण सांगितली. अरुण नलावडे म्हणाले, श्वाससारख्या विषयावर चित्रपट काढणे धाडसाचे होते. परंतु याच चित्रपटाने मराठी चित्रसृष्टीला एक वेगळी दिशा दिली. प्रशांत दामले यांनी या परिसंवादाच्या निमित्ताने राज्यातील नाट्यगृहाच्या वाईट स्थितीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.(प्रतिनिधी)
समाजजीवनाच्या प्रतिबिंबातूनच सापडतात कथाबीज
By admin | Updated: November 12, 2016 03:03 IST