भरतीच्या बनावट मॅसेजने शेकडो तरुणांना फसविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:07 AM2019-12-27T00:07:26+5:302019-12-27T00:09:39+5:30

भरतीचा बनावट मॅसेज वाचून राज्यातील विविध जिल्ह्यातून बुधवारी नागपूरला आलेल्या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. एरिया रिक्रूटमेंट ऑफीस(एआरओ)कडून कोणत्याही भरतीची प्रक्रिया नसल्याची माहिती मिळाल्यानंतर उमेदवार निराश झाले.

Fake messages of recruitment deceive hundreds of youths! | भरतीच्या बनावट मॅसेजने शेकडो तरुणांना फसविले!

भरतीच्या बनावट मॅसेजने शेकडो तरुणांना फसविले!

Next
ठळक मुद्देराज्यभरातून आले उमेदवार : अखेर पोलिसांना काढावी लागली समजूत

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : भरतीचा बनावट मॅसेज वाचून राज्यातील विविध जिल्ह्यातून बुधवारी नागपूरला आलेल्या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. एरिया रिक्रूटमेंट ऑफीस(एआरओ)कडून कोणत्याही भरतीची प्रक्रिया नसल्याची माहिती मिळाल्यानंतर उमेदवार निराश झाले. त्यामुळे व्हॉटस्अप मॅसेज आल्यानंतर त्याची खातरजमा केली असती तर आपली फसवणूक झाली नसती, असे उमेदवारांना वाटले.
सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, पुणे, जळगाव, भुसावळ आदी ठिकाणचे तरुण दुपारी २ पासून नागपुरात पोहोचणे सुरू झाले. विदर्भातूनही उमेदवार दाखल झाले. त्यामुळे एआरओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी झाली. तरुणांंना आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. प्रवेशद्वारावर जवान तरुणांंना भरती नसल्याचे सांगून घरी परत जाण्याचा सल्ला देत होते.‘लोकमत’शी बोलताना तरुणांंनी भरती असल्यामुळे अपेक्षेने आल्याचे सांगितले. अनेकजण उसणे पैसे घेऊन आले होते. येथे आल्यानंतर त्यांना फटका बसला. बनावट मॅसेज कुणी पसरविला, याचा तरुण शोध घेत आहेत. याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी तरुणांंची समजूत घातली. यानंतर पुन्हा असा मॅसेज आल्यास खातरजमा करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला.
नागपुरात नाही ‘टीए’
विशेष म्हणजे टेरिटोरियल आर्मी (टीए) म्हणजे प्रादेशिक सेनेचे कार्यालय नागपुरातून स्थानांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या वतीने नागपुरात भरती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भरतीच्या वेळी सेनेकडून अधिकृतरीत्या माहिती देण्यात येते. त्यामुळे हा मॅसेज बनावट असल्याचे सिद्ध झाले.
राहणार कुठे ?
भरती नसल्याचे समजल्यानंतर तरुणांना रात्र कुठे काढावी, असा प्रश्न पडला. गोंदिया, भंडारा, नागपूरच्या आजूबाजूच्या परिसरातील युवक परत गेले. परंतु गडचिरोलीसह राज्यातील इतर भागातून आलेल्या तरुणांंना राहण्याचा प्रश्न पडला. गावाकडे जाण्यासाठी रेल्वे तसेच बसही नव्हती. खासगी वाहनाने जाण्यापुरतेही पैसे त्यांच्याकडे नव्हते.

Web Title: Fake messages of recruitment deceive hundreds of youths!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.