नागपूर : नागपूर मेट्रोत नोकरी लावून देण्याचे खोटे अमिश दाखवत पैसे घेणाऱ्या सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. रूपेश शेंडे असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्याने अक्षय नगराळे नामक आपल्या नातेवाईकाकडून मेट्रोत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ५० हजार रुपये घेतले होते. फसगत झाल्याचे समजल्यावर अक्षय नगराळे याने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या संपूर्ण प्रकरणाची नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश आऊटसोर्सिंग एजन्सीला दिले. एजन्सीने रुपेश शेंडेचे बयाण नोंदवले. त्याने अक्षय नगराळेकडून पैसे घेतल्याचे मान्य केले. त्यानंतर एजन्सीने त्याला निलंबित केले.पैशांची मागणी करत महामेट्रोत नोकरी लावून देण्याचे आमिष दिले जाण्याचे आणि अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार शहरात होत असून नागपूर मेट्रोने या संबंधित नागरिकांना सातत्याने सतर्क केले आहे. अशा कुठल्याही पद्धतीने नागपूर मेट्रोत नोकरी मिळत नाही. नोकरीसाठी पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्तीसंदर्भात सावध राहण्याचे आवाहन महामेट्रोने केले आहे. अशा फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये शहराच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद देखील झाली आहे. या संदर्भात महामेट्रोतर्फे सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जागृती करण्यात येते. पदभरतीची माहिती महामेट्रोची वेबसाईट आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केली जाते. शिवाय शंका असल्यास महामेट्रोची अधिकृत वेबसाईट किंवा मेट्रो भवन कार्यालयात संपर्क साधता येतो.
नागपूर मेट्रोत नोकरी लावून देण्याचे खोटे अमिश; सुरक्षा रक्षक निलंबित
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 14, 2024 7:31 PM