तोंडाला काळे फासले : धरमपेठ पॉलिटेक्निक मधील घटना नागपूर : परीक्षेत कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थिनीला तिचा मोबाईल व प्रवेशपत्र परत देण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या धरमपेठ पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप देत काळे फासले. तसेच त्याची धिंड काढून पोलिसांच्या स्वाधीन केले. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून प्राध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अमित गणवीर असे आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. पीडित २० वर्षीय विद्यार्थिनी ही पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी आहे. गेल्या १३ एप्रिल रोजीची ही घटना आहे. पीडित विद्यार्थिनी ही धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये परीक्षा देत होती. पेपर सोडवित असताना तिने कॉपी केली. ती अमित गणवीर याने पकडली. त्यामुळे तिचा पेपर घेऊन कॉपी, प्रवेशपत्र आणि मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच तिचा पेपरही परत घेण्यात आला. तो मोबाईल प्रा. गणवीरने ताब्यात ठेवला होता. तो परत मागण्यासाठी ती विद्यार्थिनी त्याला भेटली. त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. विद्यार्थिनीने नकार दिला. आठवडाभरापासून ती त्याला मोबाईल परत मागत होती. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने शिवसेनेचे नेते पंजू तोतवानी यांच्याशी संपर्क साधला त्यांना घडलेला प्रकार सांगितला. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पंजू तोतवानी आपल्या कार्यकर्त्यांसह कॉलेजमध्ये आले. त्यावेळी प्रा. गणवीर स्टाफ रूममध्ये होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला बाहेर काढले. मारहाण केली, तोंडाला काळे फासून परिसरात धिंड काढली. (प्रतिनिधी)
विद्यार्थिनीवर डोळा;शिक्षकाला चोप
By admin | Updated: April 20, 2017 02:33 IST