वेल्डींग मशीन फुटली : दोन मजूर जखमी नागपूर : यशोधरानगर येथील एका कबाडी वस्तूच्या गोदामात काम करीत असताना वेल्डींग मशीनचा स्फोट झाला. यात दोन मजूर जखमी झाले. या घटनेमुळे यशोधरानगर हादरले आहे. यासंदर्भात पोलिसांकडून कुठलीही माहिती दिली जात नसल्याने वेगवेगळी चर्चा केली जात आहे. टिपू सुलतान चौकात मीरा कंपनी आहे. येथे कबाडी वस्तूंचे गोदाम आहे. दुपारी २.४५ वाजता काही मजूर येथे वेल्डींग मशीनवर काम करीत होते. या दरम्यान अचानक स्फोट झाल्याने आग लागली. यात ३० वर्षीय मजूर शेख इकबाल गंभीर जखमी झाला तर किसन नावाच्या मजुरासह इतर तीन-चार जणही जखमी झाले. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला. लोकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला सूचना दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलीसही घटनास्थळावरून लगेच परत आले. या घटनेबाबत पोलिसांना माहिती विचारली असता त्यांनी सामान्य घटना असल्याचे सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याबाबतही पोलिसांनी नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी मजुरांच्या सुरक्षेची कुठलीही काळजी घेण्यात आलेली नव्हती. (प्रतिनिधी)
स्फोटाने हादरले यशोधरानगर
By admin | Updated: April 6, 2017 02:21 IST