शरद मिरे
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड) : उमरेडमधील एमआयडीसीत असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघांचा शनिवारी पहाटे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन मसराम (26 रा. पांजरेपार, ता. भिवापूर) तर पियुष दुर्गे (20 रा. पांजरेपार, ता. भिवापूर) अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय जे तीन कामगार कंपनीत जळून मृत पावले होते. त्यांची ओळख पटली आहे. अभिलाष कमलाकर जंवजाळ (रा. गावसुत ता. उमरेड), निखील तुकाराम शेंडे (रा. गोंडबोरी ता. भिवापूर), निखील गंगाधर नेहारे (रा. चिखलधोकडा ता. उमरेड) अशी त्यांची नावे आहेत
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एमएमपी इंडस्ट्रीज लि. कंपनीत मोठा स्फोट झाला होता. येथे लागलेल्या आगीवर शनिवारी पहाटे नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती.
उमरेड एमआयडीसीत एमएमपी ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. कच्च्या ॲल्युमिनियम पावडरचा उपयोग करून ॲल्युमिनियम फाॅइलला पॉलिश करण्याचे काम ज्या मशीनमध्ये केले जाते, ती मशीन हाताळत असताना, कंपनीत अचानक स्फोट झाला होता.
१५० कामगार बचावलेया कंपनीत एकूण ४५० कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते. स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. दरम्यान, कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले. यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले.
कंपनीत चार युनिटया कंपनीत चार युनिट आहेत. स्फोट ज्या ठिकाणी झाला तिथे २२ कामगार कर्तव्यावर होते, अशी माहिती आहे. विनोद खंडेलवाल या कंपनीचे संचालक तर ललित भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.