नागपूर : सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या वन परिक्षेत्र अधिकार्यांचा (आरएफओ) राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एस. डब्ल्यू. एच. नकवी यांनी वनभवन येथे क्लास घेतला. दरम्यान, नकवी यांनी प्रशिक्षणार्थी अधिकार्यांना वन्यजीव संरक्षण व व्यवस्थापनाविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची अलीकडेच वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्या सर्व प्रशिक्षणार्थी कुंडल येथे १८ महिन्यांचे प्रशिक्षण घेत आहेत. ते प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांची राज्यभरातील वेगवेगळ्या वन परिक्षेत्रात पदस्थापना करण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी त्यांना राज्यातील वन विभागाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने गत २८ एप्रिलपासून अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी दोन दिवसांपूर्वी वन विभागाचे मुख्यालय असलेल्या 'वनभवन' येथे भेट दिली. यात एकूण २८ प्रशिक्षणार्थी अधिकार्यांचा समावेश होता. दरम्यान, प्रशिक्षणार्थ्यांनी वनभवन येथील जीएसआय कक्षास भेट देऊ न, तेथील संगणक व इंटरनेटद्वारे होत असलेल्या वन्यजीव संरक्षणाची माहिती घेतली. यावेळी वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती, तंत्रज्ञान व धोरण) डॉ. मोहन झा, प्रसिद्धी व माहिती अधिकारी कमलाकर धामगे यांनीही प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
वनबल प्रमुखांनी घेतला प्रशिक्षणार्थी 'आरएफओ' चा क्लास
By admin | Updated: May 9, 2014 02:36 IST