उमरेड : गत दहा दिवसात १९ लोकांचा मृत्यू झालेल्या उमरेड तालुक्यातील चनोडा गाव शुक्रवारी सील करण्यात आले. मागील काही दिवसांपासून गावात मृत्यूंचा आकडा वाढतच असून शुक्रवारीसुद्धा दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. दररोज होत असलेल्या मृत्यूमुळे गावकरी भयभीत झाले आहेत. सुरुवातीला गावकऱ्यांनी कोरोना टेस्टसाठी नकार दर्शविला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी टेस्टिंगची तयारी दाखविल्यानंतर फारच कमी टेस्टिंग केल्या जात आहेत. मागील तीन दिवसात तालुका आरोग्य विभागाच्या वतीने दरदिवशी केवळ ५० जणांची कोरोना टेस्ट केली जात आहे. वारंवार होत असलेल्या मृत्यूनंतर आणि गाव सील केल्यानंतरसुद्धा केवळ ५० किट पाठविण्यात आल्या. यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. स्थानिक जिल्हा परिषद शाळेत कोविड रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु अव्यवस्थेमुळे रुग्ण या ठिकाणी थांबण्यास तयार नाहीत. चनोडा गावातील समस्येकडे लक्ष कोण देणार, असा सवाल विचारला जात आहे.
अखेर चनोडा गाव केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST