सुनील चरपे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील कृषी व महसूल विभागाच्या तुलनेत ग्रामविकास विभागात पुरेसे मनुष्यबळ आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान चार कर्मचारी त्या गावांमधील कायम रहिवासी असल्याने त्यांची प्रत्येक शेतकऱ्यासोबत ओळख आहे. या विभागाला केवळ गावात दवंडी देऊन शेतकऱ्यांना गोळा करण्याचे काम दिले असताना ग्रामसेवकांनी अतिरिक्त कामाची झळ नको म्हणून ॲग्रिस्टॅकचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस दिरंगाई होत आहे.
ॲग्रिस्टॅकच्या अंमलबजावणीसाठी महसूल, कृषी व ग्रामविकास या तीन विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तलाठ्यांवर ॲपवर शेतकऱ्यांची माहिती फीड करण्याची जबाबदारी सोपविली असून, ग्रामसेवकांकडे या प्रकल्पाच्या प्रचार व प्रसाराची तसेच गावातील शेतकऱ्यांना गोळा करण्याचे काम दिले आहे. ग्रामसेवक व कृषी सहायक यापैकी एकाने तलाठ्यास मदत करावयाची आहे. एका ग्रामसेवकाकडे किमान एक व कमाल दोन ग्रामपंचायती असून, एका ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक, पाणीपुरवठा कर्मचारी, रोजगार सेवक व शिपाई असे चार कर्मचारी आहेत. ते सर्व त्याच गावातील रहिवासी असतात.
एका तलाठ्याकडे मदतनीस म्हणून केवळ एक कोतवाल असून, एका तलाठी सजात किमान एक व कमाल पाच ते सात गावे असतात. कृषी सहायकांना मदतनीस व स्वतःचे कार्यालय नाही. त्यांच्याकडे साधनांचा मोठा अभाव असून, त्यांची पदेही रिक्त आहेत. त्यांना किमान ९ ते १२ गाते सांभाळावी लागतात. पुरेसे मनुष्यबळ असलेल्या ग्रामसेवकांना केवळ निर्देश देऊन ॲग्रिस्टॅकची कामे करायची असताना ते याला अतिरिक्त काम समजून जबाबदारी टाळत आहेत.
अचूक पायाभूत माहितीचा अभाव
- पूर्वीच्या सर्व्हे नंबरचे आता शेतीच्या पोट हिस्स्यामुळे गट नंबर झाले आहेत. शेतीचे जिओ टॅगिंग नकाशाप्रमाणे केले आहे. काही ठिकाणी नकाशा व वास्तविक ताबा वेगवेगळा आहे.
- प्रत्यक्ष वाहीत क्षेत्र एकत्र नसल्याने अॅग्रिस्टेंक नोंदणीत अडचणी येत आहेत. जिओ टैगिंग सव्र्व्हे क्रमांकाप्रमाणे असते तर ही समस्या उद्भवली नसती.
डेटा महसूल विभागाकडे
- शेतीचा संपूर्ण डेटा महसूल विभागाकडे असून, तो ऑनलाइन उपलब्ध आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे एकूण शेतीक्षेत्र त्याच्या गाव नमुना आठ-अ'मध्ये समाविष्ट आहे.
- ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांना एकत्र केल्यास तलाठी हा डेटा लगेच काढून देऊ शकतो. ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालकाच्या मदतीने ॲग्रिस्टॅक नोंदणी करता येऊ शकते.
कामाचा व्याप मोठ्या शहरालगतच्या तलाठ्यांकडे रोज किमान चार, पाच फेरफार करण्यासह इतर कामे असतात. ग्रामीण भागातील तलाठ्यांकडे ही कामे कमी असतात. त्यांच्या तुलनेत ग्रामसेवकांकडे कामाचा व्याप व ताण थोडा कमी असतो. कृषी सहायक या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सर्वच बाबींमध्ये अगतिक आहेत.