नागपूर : आयुष्याला दिशा देणाऱ्या दहावीच्या परीक्षेवेळी कुटुंबीयांचा आशीर्वाद फार मोठे बळ देऊन जातो. परंतु ज्या वडिलांनी बोट धरून चालायला शिकविले, आयुष्यभराचे संस्कार दिले व सदैव माया केली तेच परीक्षेच्या वेळी अचानक जगातूनच निघून गेले तर! कितीही हुशार विद्यार्थी असेल तरी तो या धक्क्याने कोलमडून जाईल.वर्धमाननगर येथील ‘एमएसबी’ स्कूलचा दहावीचा (‘आयसीएसई’ बोर्ड) विद्यार्थी मुफ्फद्दल कुतुबुद्दीन कांचवाला याच्या डोक्यावरुन ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी वडिलांचे छत्र हरपले. परंतु वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारत त्याने परीक्षा दिली व प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला. आपल्या दृढनिश्चयाने यश खेचून आणणाऱ्या मुफ्फद्दलने आपल्या वडिलांना हीच श्रद्धांजली अर्पण केली आहे.दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी मुफ्फद्दल पूर्ण जोमाने अभ्यासाला लागला होता. त्याचे वडीलदेखील त्याला नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. परीक्षा झाल्यावर पुढे काय करायचे याबाबत त्यांच्या चर्चादेखील रंगायच्या. परंतु परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस अगोदर हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले. या घटनेमुळे मुफ्फद्दल पूर्णपणे कोलमडून गेला होता. तो परीक्षा देऊ शकेल की नाही याची त्याच्या नातेवाईकांना शाश्वती नव्हती. परंतु त्याच्या शिक्षकांनी तसेच मित्रांनी त्याला धीर दिला व ही परीक्षा किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले. शिवाय या परीक्षेत यश मिळवून वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पहिले पाऊल टाकशील असेदेखील शिक्षकांनी सांगितले. केवळ रडत राहण्यापेक्षा परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन वडिलांना खरी श्रद्धांजली देण्याचा निश्चय मुफ्फद्दलने मनाशी केला व यश मिळविले. सोमवारी लागलेल्या निकालांमध्ये त्याला वडिलांचे अवघ्या एक दिवस अगोदर निधन झाले असतानादेखील ७८ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. (प्रतिनिधी)
दु:खाचा डोंगर कोसळला तरी...
By admin | Updated: May 19, 2015 01:43 IST