आशिष दुबे
नागपूर : राज्य शिक्षण मंडळ इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करीत आहे. विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्राच्या उत्तरपत्रिका इंग्रजीचे शिक्षक तपासत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
नियमानुसार अर्थशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका याच विषयाच्या अनुभवी व पात्र शिक्षकाने तपासणे आवश्यक आहे. हा नियम सर्वच विषयांना लागू आहे. असे असताना शिक्षण मंडळ नियमबाह्य कृती करीत आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता धोकादायक आहे. मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी अशी चूक झाली होती व ती चूक सुधारण्यात आली, अशी माहिती दिली. मूल्यांकन नियमानुसार होत आहे. मूल्यांकनाकरिता पात्र शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांनी चूक केल्यास त्यात सुधारणा करण्यासाठी मॉडरेटर व चिफ मॉडरेटर असतात. सध्या मूल्यांकनात काहीच गडबड नाही, असेही वंजारी यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी दुर्गावतीनगर येथील इंग्रजीच्या शिक्षकाला अर्थशास्त्राच्या उत्तरपत्रिका मिळाल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात मंडळाला कळवले होते. परंतु, उत्तरपत्रिका बदलण्यात आल्या नाहीत. परिणामी, शिक्षक मूल्यांकन करीत आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत.
उत्तरपत्रिका पाठविण्यात निष्काळजीपणा
शिक्षकाकडे उत्तरपत्रिका पाठविताना मंडळाद्वारे निष्काळजीपणा केला जात आहे. शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयातील महिला शिक्षिकेला उत्तरपत्रिकाच मिळाल्या नाहीत. त्यांनी मंडळाला विचारणा केली असता पत्ता चुकीचा असल्याचे उत्तर देण्यात आले व उत्तरपत्रिका घेण्यासाठी त्यांना कार्यालयात बोलावण्यात आले.