‘नर्सरी अ‍ॅक्ट’ची प्रभावी अंमलबजावणी हवी; अमोल तोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 08:01 AM2019-01-18T08:01:01+5:302019-01-18T08:05:02+5:30

महाराष्ट्र व देशातही नर्सरी अ‍ॅक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. हे काम वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून होऊ शकेल, अशी अपेक्षा ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे यांनी व्यक्त केली.

Effective enforcement of the Nursery Act; Amol Tote | ‘नर्सरी अ‍ॅक्ट’ची प्रभावी अंमलबजावणी हवी; अमोल तोटे

‘नर्सरी अ‍ॅक्ट’ची प्रभावी अंमलबजावणी हवी; अमोल तोटे

Next
ठळक मुद्देवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलकडून अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नर्सरीमध्ये चुकीच्या पद्धतीने संत्र्यांची कलमे तयार होत आहेत. रोगयुक्त कलम तयार होत असल्याने झाडे खराब होताहेत. परिणामी संत्र्याचे उत्पादन दीड लाख मेट्रिक टनावरून १ लाख २० हजार टनावर आले आहे. ३० हजार मेट्रिक टनाचे उत्पादन घटले आहे, ही चिंतेची बाब आहे. तेव्हा संत्र्याचे रोगमुक्त कलम तयार करण्यासाठी आणि झाडे खराब होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र व देशातही नर्सरी अ‍ॅक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. हे काम वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून होऊ शकेल, अशी अपेक्षा ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडिया (भारतीय संत्रा उत्पादक संघ)चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे यांनी व्यक्त केली. ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय संत्रा उत्पादक संघ ही संस्था केंद्र सरकारच्या कृषी विभागाने स्वत: तयार केली आहे. त्यामुळे या संघाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे ते नॉलेज पार्टनर आहे.
या पार्श्वभूमीवर अमोल तोटे यांनी लोकमतशी संवाद साधला. ते म्हणाले, संत्र्याची निर्यात होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने चांगले पाऊल टाकले आहे. ४ डिसेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारने निर्यात धोरण जाहीर केले. त्यात निर्यात होणाऱ्या ४० फळांच्या यादीत संत्र्याचाही समावेश केला. यामध्ये नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निर्यातीच्या दृष्टीने केंद्र सरकारने चांगले पाऊल उचलले आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाकडूनही आता संत्रा उत्पादकांना कशी मदत होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. संत्र्याच्या निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात नाहीत. वरुड येथील युनिट वगळता पॅकेजिंग लाईनची सुविधा ही आऊटडेटेड झाली आहे. ती सुधारण्याची गरज आहे. यामध्ये खासगी क्षेत्राची गुंतवणूक वाढेल, यादृष्टीने शासनाने प्रयत्न करावे.
संत्र्याचे कर्ज दर २००६ पासून रिव्हाईज झालेले नाही. पूर्वी ४२ रुपये प्रती झाड प्रती वर्ष असे कर्ज मिळायचे. परंतु भारतीय संत्रा उत्पादक संघाच्या रेट्यामुळे आता ते २३० रुपये प्रती झाड झाले आहे. अमरावती येथील बँका ३०० रुपये प्रती झाडप्रमाणे कर्ज देतातही परंतु नागपुराील बँका देत नाहीत अशी परिस्थिती आहे. संत्र्यासाठी प्रती झाड किमान ९०० रुपये कर्ज मिळायला हवे.
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही तोटे यांनी स्पष्ट केले.

जगभरातील शास्त्रज्ञ व संत्रा तज्ज्ञांचे मार्गदर्शन
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जगभरातील विविध तंत्रज्ञ अवगत व्हावे, यासाठी जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञ व तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. या संत्रा महोत्सवात १० देशातील १७ तज्ज्ञ सहभागी होतील. यामध्ये डॉ. सुली ब्रीटो सिल्वा (ब्राझील), डॉ. गिलबर्टो टोझाट्टी (ब्राझील), डॉ. क्वॉन सांग (दक्षिण कोरिया), डॉ. एन. हुआ (व्हिएतनाम), डॉ. सिद्धरामे गौडा (अमेरिका, फ्लोरिडा), डॉ. बालाजी आगलावे (अमेरिका, फ्लोरिडा), डॉ. त्शेरिंग पेंन्जॉर (भूतान), प्रो. केझॉन्ग त्शेरिंग (भूतान), डॉ. शांता कार्की (नेपाळ), डॉ. उमेश आचार्य (नेपाळ), डॉ. इब्राहीम ओर्टास (तुर्की), डॉ. तुरगुट यिशीलोगलू (तुर्की), डॉ. डब्ल्यू.डी. लेस्ली (श्रीलंका), डॉ. जी. एन. अरुणाथिलाका (श्रीलंका), डॉ. पॅट्रीक झू (चीन), डॉ. होर फेन (कम्बोडिया) डॉ. काँग वॉऊशिम (कम्बोडिया) यांचा समावेश आहे.

 या महोत्सवात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जगभरातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती अवगत केली जाईल, तेव्हा त्यांनी याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा. आपल्या सूचनाही सादर कराव्या, असे तोटे यांनी सांगितले.

Web Title: Effective enforcement of the Nursery Act; Amol Tote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.