अंबाझरीत ७५० हेक्टरचा बायोडायव्हर्सिटी पार्क : सेमिनरी हिल्ससाठी पाच वर्षांचा मास्टर प्लानजितेंद्र ढवळे नागपूर उपराजधानीच्या सौैंदर्यात भर घालण्यासाठी आणि स्मार्ट सिटीची संकल्पना वास्तवात साकारण्यासाठी इको टुरिझमला बुस्ट देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यासाठी वनविभागाच्या मदतीने विकास आराखडाही निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार अंबाझरी येथील ७५० हेक्टर जागेवर बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्यात येणार आहे. पार्कची संकल्पना जुनी असली तरी पुढील वर्षांपासून ती वास्तवात येईल. यासाठी २०१६-१७ या वर्षांत १४ कोटी ३४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय बच्चे कंपनीचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या सेमिनरी हिल्स आणि बालोद्यानला नवसंजीवनी देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. येथे ५ कोटी ९१ हजार रुपयांची विविध कामे करण्यात येतील. नागपुरात राजभवन परिसरात ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’ उभारण्यात आला आहे. मात्र त्याचे क्षेत्र मर्यादित आहे. त्यामुळे अंबाझरी येथे नवे बायोटायव्हर्सिटी पार्क विकसित केला जाणार आहे. यात १८ प्रकारचे विविध केंद्र साकारण्यात येतील. त्यात प्रामुख्याने नक्षत्र वन आणि शिव वनचा समावेश असेल. यावर नऊ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ७५० हेक्टर असलेल्या या पार्कमध्ये जलसंवर्धनावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी येथे ७ कोटी २७ लाख ६५ हजार रुपये खर्च करून सलग समपातळी चर ( सीसीटी) तयार करण्यात येतील. या सीसीटीचा उपयोग तलावातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आणि पार्कच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी होईल. याशिवाय येथील नाल्याचे रुंदीकरण आणि खोलीकरणही करण्यात येईल. यावर २२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सिमेंट आणि गॅबियन बंधाऱ्यासाठी अनुक्रमे ५५ लाख आणि २२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. येथे एक छोटेखानी सौरऊर्जा पार्कही असेल.यावर २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)
इको टुरिझम ठरणार उपराजधानीचे वैभव
By admin | Updated: February 20, 2016 03:16 IST