नागपूर : बुधवारी मध्यरात्रीनंतर अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागपूर जिल्ह्याला चांगलेच झोडपले. पावसापेक्षा वादळाचाच जोर जास्त होता अन् त्यामुळे रात्री २.३० च्या सुमारास नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. हवेचा वेग जवळपास प्रतितास ५० किलोमीटर इतका होता. सामान्यपेक्षा ही तीव्रता चारपट अधिक होती. या वादळी पावसामुळे नागपूर शहरात काही ठिकाणी झाडे पडली, तर अनेक भागांत घरांचे टीन, बाहेर ठेवलेले सामान उडाले. सकाळी ८.३० पर्यंत शहरात पाच मिमी पावसाची नोंद करण्यात आली. शिवाय पहाटेच्या सुमारास शहरात वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. नागपूर जिल्ह्यात सावनेरमध्ये ३० मिमी पाऊस झाला.लक्षद्वीपमध्ये चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली व उत्तर-पश्चिम राजस्थानपर्यंत हे वेगवान वारे पोहोचले. यामुळे मध्यभारतातदेखील याचा प्रभाव जाणवला व नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. येणाऱ्या २४ तासात परत वादळी पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक २१.२ मिमी पावसाची नोंद झाली. यासोबत वाशिममध्ये १८ मिमी, यवतमाळमध्ये १२.४ मिमी, अमरावतीमध्ये १३.२ मिमी, बुलडाण्यात ८ मिमी, अकोल्यात ५ मिमी तर ब्रम्हपुरीमध्ये २.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)तासाभराचे तांडवरात्री २.३०च्या सुमारास शहर निद्रिस्त होते. अचानक जोरदार वादळ सुरू झाले व काही वेळातच वातावरणात धूळ पसरली. ३ वाजताच्या सुमारास वादळाचा वेग आणखी वाढला. सोबतच पावसालादेखील सुरुवात झाली. शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. काही घरांचे टीन, घराबाहेर ठेवलेले सामान, कपडे उडाले. यामुळे भर पावसात नागरिकांची धावपळ झाली. वादळाचा वेग लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असावे असा अंदाज होता. परंतु फार नुकसान झाले नाही. शहरातील अर्ध्या डझनाहून अधिक झाडे मुळासकट उन्मळून पडली. धंतोली, मोक्षधाम घाट, विमानतळाजवळ तसेच नरेंद्र नगर व नारा येथे झाडे पडल्याची माहिती आहे. शिवाय अनेक ठिकाणी होर्डिंग्ज, बॅनर पडले. सर्वात मोठा फटका बसला तो आंब्याच्या मोहोराला.
अवकाळी वादळी पावसाने झोडपले
By admin | Updated: February 12, 2015 02:24 IST